वाशिम जिल्ह्यात यंदा उन्हाळी पिकांचे क्षेत्र घटणार; पाणीटंचाईचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 01:50 PM2018-01-06T13:50:50+5:302018-01-06T13:53:35+5:30
वाशिम: यंदा जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे क्षेत्र ७० टक्के घटण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात यंदा झालेला अपुरा पाऊस आणि त्यामुळे खालावलेली भूगर्भातील पातळी पाहता यंदा उन्हाळी पिकांची जोखीम शेतकरी पत्करू शकणार नाहीत.
वाशिम: यंदा जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे क्षेत्र ७० टक्के घटण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात यंदा झालेला अपुरा पाऊस आणि त्यामुळे खालावलेली भूगर्भातील पातळी पाहता यंदा उन्हाळी पिकांची जोखीम शेतकरी पत्करू शकणार नाहीत. त्यातच प्रशासनानेही शेतकºयांना पाणीटंचाईच्या पृष्ठभूमीवर उन्हाळी पिके न घेण्याचे आवाहन केले आहे.
यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात केवळ ८४ टक्के पाऊस पडला आहे. त्यातही मानोरा, वाशिम आणि मंगरुळपीर या तीन तालुक्यात ७५ टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला. त्यामुळे साहजिकच प्रकल्पांत अल्प जलसाठा उरला आणि भूगर्भातील पाणी पातळीवरही अल्प पावसाचा परिणाम झाला. अल्प पावसामुळे रब्बी पिकांचे उत्पादन घटत असल्याचे हरभºयाच्या काढणीतून दिसत आहे. अशात उन्हाळ्यात भुईमूग, मका आणि तिळासह गतवर्षात वाढलेली टरबुजाची लागवड मोठ्या प्रमाणात घटणार आहे. गतवर्षी जिल्ह्यात २० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी किंवा लागवड झाली होती. गेल्या काही वर्षांतील आकडेवारीच्या तुलनेत गतवर्षी भुईमुगाची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली होती. अर्थात गतवर्षी झालेल्या भरपूर पावसामुळे शेतकºयांनी हे धाडस केले होते. तथापि, यंदा सरासरीपेक्षा कमी झाल्यामुळे उन्हाळी पिकांचे क्षेत्र ७० टक्क्यांनी घटण्याची भिती कृषीतज्ज्ञांनी वर्तविली आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनानेही पाणीटंचाईवर नियंत्रणासाठी प्रकल्पातील साठा आरक्षीत करण्यासह विहिरी आणि कुपनलिकांचे अधिग्रहण करण्याचे ठरविले असून, शेतकºयांना उन्हाळी पिके न घेण्याचे आवाहन केले आहे.