जलसंपदा विभागाच्या प्रकल्प बांधकामात होणार कृत्रिम वाळूचा वापर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 07:00 PM2020-08-12T19:00:49+5:302020-08-12T19:01:13+5:30
कृत्रिम वाळूचा वापर करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाने ११ आॅगस्ट रोजी जिल्हास्तरीय यंत्रणेला दिल्या आहेत.
वाशिम : जलप्रकल्पाच्या विविध कामांमध्ये उद्भवणारी क्षेत्रीय परिस्थिती आणि कार्यक्षेत्राजवळ नैसर्गिक वाळू पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसेल तर यापुढे प्रकल्पांच्या बांधकामात कृत्रिम वाळूचा वापर करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाने ११ आॅगस्ट रोजी जिल्हास्तरीय यंत्रणेला दिल्या आहेत.
जलसंपदा विभागांतर्गत विविध प्रकल्प बांधकामाधीन आहेत. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील जवळपास पाच ते सहा प्रकल्पांचा समावेश आहे. जलप्रकल्पांच्या बांधकामामध्ये मोठ्या प्रमाणात वाळूचा वापर होत असल्याने वाळूची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासते. ही गरज भागविण्यासाठी वाळूचे बेकायदा उत्खनन वाढून नदी व नाल्यांच्या नैसर्गिक प्रवाहात बाधा येण्याचे प्रकार वाढीस लागले. अशा परिस्थितीत नैसर्गिक वाळूचा बांधकामातील वापर काही प्रमाणात कमी करून त्याऐवजी कृत्रिम वाळूचा वापर वाढविण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला. त्याअनुषंगाने यापुढे जलप्रकल्पांच्या बांधकामामध्ये कृत्रिम वाळूचा वापरही करता येईल, अशा सूचना ११ आॅगस्ट रोजी जिल्हास्तरीय यंत्रणेला दिल्या. चालू निविदांतर्गतच्या कामासंदर्भात नैसर्गिक वाळूऐवजी कृत्रिम वाळू वापरण्यासाठी यापुढे संबंधित मुख्य अभियंता यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहणार नाही, असेही जलसंपदा विभागाने स्पष्ट केले. कृत्रिम वाळूच्या गुणवत्तेची पडताळणी करावी तसेच कृत्रिम वाळूचा वापर सुरू केल्यावर पहिल्या सात दिवसात कार्यकारी अभियंत्यांनी किमान दोन नमुने तपासावे, असे निर्देशही जलसंपदा विभागाने जिल्हास्तरीय यंत्रणेला दिले.