मुक्या जनावरांसाठी लोकसहभागातून जंगलात बांधले कृत्रिम पाणवठे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 04:17 PM2020-02-22T16:17:37+5:302020-02-22T16:17:58+5:30
यंदाही मुक्या जिवांची तहान भागावी म्हणून ते जंगलात कृत्रिम पाणवठे उभारण्यासाठी लोकवर्गणी करीत आहेत.
- दादाराव गायकवाड
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : रखरखत्या उन्हात घोटभर पाण्यासाठी रस्त्यावर सैरावैरा धावताना वाहनाखाली चिरडल्याने दरवर्षी अनेक वन्यप्राणी मृत्यूमुखी पडतात. या गंभीर समस्येची तीव्रता कमी करण्यासाठी मंगरुळपीर येथील वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीम गेल्या चार वर्षांपासून धडपडत असून, यंदाही मुक्या जिवांची तहान भागावी म्हणून ते जंगलात कृत्रिम पाणवठे उभारण्यासाठी लोकवर्गणी करीत आहेत.
वाशिम जिल्ह्यात प्रादेशिक वनविभागाच्या अखत्यारित येणाºया जंगलाचे प्रमाण लक्षणीय आहे. या जंगलात प्रामुख्याने, निलगाय, काळविट, हरीण, ससे, रानडुक्कर, माकडे आदिंची संख्या मोठी असली तरी, या जंगलात बिबट, तरस, अस्वल आदि प्राण्यांचाही अधिवास आहे. जंगलात नैसर्गिक जलस्त्रोतांचे प्रमाण नगण्य असून, उन्हाळ्यापूर्वीच ते कोरडे पडतात, तर वनविभागाने तयार केलेले पाणवठेही खूप कमी आहेत. त्यामुळे हे प्राणी पाण्यासाठी शेतशिवार, लोकवस्तीत धाव घेतात. यातून कधी वन्यजीव-मानव संघर्षामुळे, तर कधी रस्ता ओलांडताना वाहनाखाली सापडून त्यांना प्राण गमवावे लागते. जैवविविधतेच्या दृष्टीकोणातून ही बाब गंभीर आहे. हे लक्षात घेऊनच मानद वन्यजीव रक्षक गौरवकुमार इंगळे यांच्या मार्गदर्शनात वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीम मागील चार वर्षांपासून जंगलात लोकसहभागातून कृत्रिम पाणवठे उभारत आहे. यंदाही ते त्यासाठी गावोगाव फिरुन वन्यजीवप्रेमी तथा सामाजिक कार्यकर्त्यांकडे ते लोकवर्गणी करीत आहेत.
१५ दिवसांत २२ हजारांची रक्कम
वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीमच्या वनोजा शाखेचे सदस्य चेतन महल्ले, अमर खडसे, शुभम हेकड, उमेश वारेकर, सौरव इंगोले, सतिश गावंडे, सतिष राठोड, वैभव गावंडे, हरिष इंगोले, आदित्य इंगोले आदिंनी यंदा आजवर १५ हजार रुपयांच्यावर, तर कोलार शाखेचे सदस्य संदीप ठाकरे, नंदू सातपुते, विष्णू गावंडे, श्रीकांत डापसे, उमेश जंगले, अतुल डापसे, गौरव पुसदकर, शुभम सावळे, प्रवीण आंबोर, आशिष ठाकरे आणि प्रणव कबाडे यांनी ७ हजार रुपये गोळा केले आहेत.