शिरपूर येथील ग्रामसेवक अरूण इंगळे निलंबित !
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 05:59 PM2019-04-26T17:59:20+5:302019-04-26T18:06:43+5:30
सीईओंची कारवाई : ‘नरेगा’चे तीन पॅनल तांत्रिक अधिकारीही सेवेतून कमी
वाशिम - जिल्ह्यातील मालेगाव पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या शिरपूर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक अरूण निंबाजी इंगळे यांना मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या आदेशाने शुक्रवार, २६ एप्रिल रोजी निलंबित करण्यात आले. यासह महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) अंतर्गत रिसोड पंचायत समितीमधील दोन आणि मालेगाव पंचायत समितीमधील एक अशा तीन पॅनल तांत्रिक अधिकारी (पीटीओ) यांनाही कंत्राटी सेवेतून कमी करण्यात आले आहे.
कर्तव्यात कसुर करणे, शासन निर्णयानुसार ई निविदा प्रक्रिया न राबविणे आणि शासकीय निधीमध्ये अनियमितता करणे असे आरोप ग्रामसेवक इंगळे यांच्यावर ठेवण्यात आले आले आहेत. मनरेगाअंतर्गत पंचायत समिती, रिसोड येथे कंत्राटी तत्वावर कार्यरत महेश लक्ष्मण काळपांडे, गजानन भागवत राजगुरु आणि मालेगाव पंचायत समितीत कार्यरत धनंजय ज्ञानबा बोरकर या तीन पॅनल तांत्रिक अधिकारी (पीटीओ) यांना मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी दिलेले उद्दिष्ट पुर्ण न करणे, बैठकांना गैरहजर असणे आणि कार्यालयात सतत गैरहजर राहणे आदी कारणांवरून सेवेतून कमी केले.