'अरूणावती'चे पात्र कोरडे; मानोरा तालुक्यात यंदा भीषण पाणीटंचाईचे संकेत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 08:16 PM2017-12-07T20:16:42+5:302017-12-07T20:25:45+5:30
मानोरा (वाशिम): तालुक्यातून वाहणारी अरूणावती नदी दरवर्षीच्या तुलनेत यंदा लवकरच कोरडी पडली असून तालुक्यात यावर्षी पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्याचे संकेत मिळत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा (वाशिम): तालुक्यातून वाहणारी अरूणावती नदी दरवर्षीच्या तुलनेत यंदा लवकरच कोरडी पडली असून तालुक्यात यावर्षी पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, ग्रामीण भागातील विहिरी, हातपंपांची पाणीपातळीही खोलवर गेली असून प्रशासनाच्या वतीने ७२ गावे टंचाईग्रस्त घोषित करण्यात आले आहेत.
एरव्ही फेब्रूवारीनंतर जाणवणा-या पाणीटंचाईची चाहुल यावर्षी मात्र डिसेंबर महिन्यातच जाणवायला सुरूवात झाली आहे. पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून ७२ गावांपैकी ३१ गावांना विहिर अधिग्रहण करून पाणी पुरविण्याची बाब प्रस्तावित आहे; परंतु विहिरींची पाणीपातळी देखील खालावल्याने पाणीपुरवठा व्यवस्थित होईल अथवा नाही, याबाबत नागरिकांसोबतच प्रशासनही संभ्रमात सापडले आहे. याशिवाय उर्वरित गावांना आॅक्टोबर ते जून या कालावधीत टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. तातडीने पाणीपुरवठा करण्याकरिता तालुक्यातील कुपटा व सावरगाव फॉरेस्ट या गावांनी तहसील कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केले आहेत, अशी माहिती प्राप्त झाली.