आचारसंहिता लागताच साडीचे वाटप थांबविले! १८ हजार महिलांना आता जूनमध्ये मिळणार साडी
By दिनेश पठाडे | Published: March 18, 2024 04:07 PM2024-03-18T16:07:24+5:302024-03-18T16:08:07+5:30
निर्णयानुसार अंत्योदय शिधापत्रिकांवर प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी रेशन दुकानावर मोफत वितरीत करण्यात येत आहे.
वाशिम : अंतोदय शिधापत्रिकाधारक कुटुंबाला प्रत्येकी एक साडी मोफत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यानुसार जिल्ह्यात उपलब्ध झालेल्या साड्यांचे वाटप रेशनदुकानदारांकडून सुरु होते. अशातच आचारसंहिता लागू झाल्याने साडीचे वितरण थांबविण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाकडून देण्यात आली.
निर्णयानुसार अंत्योदय शिधापत्रिकांवर प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी रेशन दुकानावर मोफत वितरीत करण्यात येत आहे. यंदा प्रजासत्ताक दिन ते होळीच्या सणापर्यंत या साडीचे वितरण करण्याचे नियोजन होते. मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे साडी वाटपाला ब्रेक लागला आहे.
जिल्ह्यातील ४९ हजार ८७५ रेशनकार्डधारक कुटुंबाला साडी वाटपाचे उद्दिष्ट आहे. फेब्रुवारी महिन्यात मानोरा, कारंजा आणि मालेगाव तालुक्यात साडी वाटपास प्रारंभ झाला. त्यानंतर इतर सर्व तालुक्यातील उद्दिष्टानुसार साडी प्राप्त झाल्यामुळे मार्च महिन्यात सुरुवातीपासूनच साडी वाटपाला गती देण्यात आली. त्यामुळे १८ मार्चच्या अहवालानुसार ३१ हजार ७३८ अंतोदय रेशनकार्डधारक महिलांना साडी वाटप करण्यात आली. उर्वरित १८ हजार महिलांना आचारंसहिता संपुष्टात आल्यानंतर जूनच्या दुसऱ्या आठवड्यात साडी वाटप केली जाणार आहे.