आसेगावातील जनतेला १४ दिवसांत एकदा होतो पाणी पुरवठा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 06:57 PM2017-11-28T18:57:18+5:302017-11-28T19:05:01+5:30
अपु-या पावसामुळे जलसाठे आटले असतानाच महावितरणकडून करण्यात येत असलेल्या भारनियमनामुळे आसेगावतील जनतेला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी तब्बल १४ दिवसानंतर पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आसेगाव (वाशिम): यंदाच्या अपु-या पावसामुळे जलसाठे आटले असतानाच महावितरणकडून करण्यात येत असलेल्या भारनियमनामुळे आसेगावतील जनतेला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी तीन प्रभागातील जनतेला तब्बल १४ दिवसानंतर पाणी पुरवठा करण्यात येत आहे. गावातील विहिरी आणि कूपनलिकांची पातळीही खोल गेल्याने ग्रामस्थांचे पाण्याअभावी हाल होत आहेत.
आसेगाव येथे तीन प्रभागातील जनतेला पाणी पुरवठा करण्यासाठी १४ पाईप लाईन आहेत. यातील एका लाईनमधून पाणी सोडल्यास दुसºया लाईनमधून पाणी पुरवठा करण्यासाठी १४ दिवस प्रतिक्षा करावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांना विहिरी आणि कूपनलिका, हातपंपांचा आधार घ्यावा लागत आहे; परंतु विहिरी आणि कूपनलिकांची पातळीही खालावल्याने ग्रामस्थांचे पाण्याअभावी होत आहेत. यंदा अपुरा पाऊस पडल्याने जलसाठे आटले आहेत. त्यातच महावितरणकडून १४ तास भारनियमन करण्यात येत असल्याने पाणी पुरवठा योजनेतही अडथळे येत आहेत. एका हातपंपावर ४० ते ५० कुटंबांची भांडी ओळीने पाणी भरण्यासाठी लावून ठेवावी लागतात. त्यात हातपंपात साचलेले पाणी संपले की पुन्हा पाणी साचण्यासाठी प्रतिक्षा करावी लागत आहे. ग्रामस्थांची समस्या लक्षात घेऊन पाणी पुरवठा विभागाने नियोजन करून जनतेला पाणी पुरवठा करावा आणि महावितरणनेही भारनियमन शिथील करावे, अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत.