आसेगाव-वरूड रस्त्याची बाजू खचली; वाहनधारक त्रस्त !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 05:55 PM2019-06-02T17:55:53+5:302019-06-02T17:56:26+5:30
वाशिम : रिसोड तालुक्यातील वरूड ते आसेगाव पेन या रस्त्याची बाजू खचल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : रिसोड तालुक्यातील वरूड ते आसेगाव पेन या रस्त्याची बाजू खचल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. रस्ता तसेच पुलाची दुरूस्ती करावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्य अंजली अनिल शिंदे यांनी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे १ जून रोजी निवेदनाद्वारे केली आहे.
आसेगाव पेन या गावापासून वरूड गावाला जाण्यासाठी चार किलोमीटर अंतराचा जोड रस्ता आहे. या रस्त्याची सद्यस्थितीत पार दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या बाजू खचल्याने समोरच्या वाहनाला बाजू देताना अडचणी निर्माण होत आहेत. वरूड गावानजीक वळणावर रस्त्याची बाजू तीन ते चार फुट खोल झाल्यामुळे समोरून येणाºया वाहनाला बाजू देताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. साधारणत: १५ वर्षापूर्वी रस्त्यावर डांबरीकरण झाले होते. मात्र डांबरीकरण केव्हाचेच उखडले असून, ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. वरूड ते आसेगाव पेन या दरम्यानच्या रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी गावकºयांनी वारंवार केली. मात्र, अद्याप बांधकाम विभागाने दखल घेतली नाही. या रस्त्यादरम्यान असलेल्या पुलाचीदेखील दुरवस्था झाली आहे. सदर रस्त्याची दुरूस्ती करावी तसेच या रस्त्यादरम्यान असलेल्या पुलाची दुरूस्ती करावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्य अंजली शिंदे यांनी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. रस्ता तसेच पुलाची दुरूस्ती न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.