‘प्रेरणा’च्या मानधनापासून ‘आशा’ वंचित!

By admin | Published: April 8, 2017 10:20 PM2017-04-08T22:20:58+5:302017-04-08T22:20:58+5:30

वाशिम जिल्ह्यातील स्थिती; डिसेंबर २0१५ पासून प्रश्न प्रलंबित

'Asha' deprived of 'inspiration'! | ‘प्रेरणा’च्या मानधनापासून ‘आशा’ वंचित!

‘प्रेरणा’च्या मानधनापासून ‘आशा’ वंचित!

Next

वाशिम : प्रेरणा प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील दोन लाख कुटूंबांच्या सर्वेक्षणाचे काम आशा सेविकांनी इमानेइतबारे पार पाडले. याबदल्यात त्यांना प्रतीकुटूंब पाच रुपये मानधन दिले जाणार होते. मात्र, शासनाच्या या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी झटणार्‍या जिल्ह्यातील ९३0 आशा सेविकांनी डिसेंबर २0१५ पासून एकही रुपया मानधन मिळाले नाही. जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा यासाठी कारणीभूत ठरल्याची माहिती आहे.
मानसिकदृष्ट्या खचलेल्या विदर्भातील शेतकर्‍यांना नैराश्येच्या गर्तेतून बाहेर काढून त्यांना आत्मभान प्रदान करण्यासाठी शासनाने प्रेरणा प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली. याअंतर्गत वाशिम जिल्ह्यातील दोन लाख शेतकरी कुटुंबांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी आशा सेविकांना देण्यात आली. त्यानुसार ९३0 आशां सेविकांनी हे काम चोखपणे पार पाडले. तब्बल तीनवेळा शेतकरी कुटुंबांचे सर्वेक्षण झाले. त्यापैकी दोनवेळा झालेल्या सर्वेक्षणाच्या मानधनाची बिले जिल्हा परिषद प्रशासनाकडून जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे सादर करण्यात आली; मात्र याबाबत जिल्हा सामान्य रुग्णालयाने हलगर्जीपणाचा प्रत्यय देत डिसेंबर २0१५ पासून आजतागायत एकाही आशा सेविकेला मानधन देण्यात आले नाही. आशा सेविकांच्या थकीत मानधनाचा हा आकडा तब्बल २0 लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासन आशा सेविकांच्या मानधनाबाबत घेत असलेल्या दुटप्पीपणाच्या भूमिकेमुळे तीसर्‍यांदा झालेल्या सर्वेक्षणाची बिलेच तालुकास्तरावरून सादर करण्यात आलेली नाहीत. या अन्यायाप्रती जिल्ह्यातील सर्वच आशा सेविका आंदोलन उभारण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना दिली.

जिल्हा परिषदेकडून सर्वच आशा सेविकांच्या मानधनाचे प्रस्ताव जिल्हा सामान्य रुग्णालयास अगदी वेळेत सादर करण्यात आला. मात्र डिसेंबर २0१५ पासून कुठल्याच आशा सेविकेला मानधन देण्यात आले नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयाने त्यांच्याकडे प्रलंबित असलेला मानधनाचा हा प्रश्न विनाविलंब निकाली काढण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा आहे.

- अनिल उंदरे
समन्वयक, आशा सेविका, वाशिम

प्रेरणा प्रकल्पांतर्गत शेतकरी कुटूंबियांच्या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या जिल्ह्यातील सर्वच आशा सेविकांचे मानधन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची पद्धत आहे. मात्र या प्रक्रियेस संबंधित बँकांनी सहकार्य केले नाही. त्यामुळेच डिसेंबर २0१५ पासून आजतागायत हा प्रश्न प्रलंबित राहिला. असे असले तरी लवकरच थांबलेली प्रक्रिया पूर्ण करून आशा सेविकांना देय असलेले मानधन अदा करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.
- डॉ.एन.बी.पटेल
जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम
 

Web Title: 'Asha' deprived of 'inspiration'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.