अशोक पखाले यांचा मृतदेह मिळाला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 01:43 AM2017-08-26T01:43:42+5:302017-08-26T01:43:59+5:30
मालेगाव: भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अशोक पखाले हे तालुक्यातील कोल्ही येथील लघू पाटबंधारे प्रकल्पाच्या तलावात गुरुवारी सकाळपासून बेपत्ता होते. शुक्रवार, २५ ऑगस्ट दुपारी प्रकल्पातील पाण्यात त्यांचा मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश मिळाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव: भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अशोक पखाले हे तालुक्यातील कोल्ही येथील लघू पाटबंधारे प्रकल्पाच्या तलावात गुरुवारी सकाळपासून बेपत्ता होते. शुक्रवार, २५ ऑगस्ट दुपारी प्रकल्पातील पाण्यात त्यांचा मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश मिळाले.
भारत मुक्ती मोर्चाचे कार्य करण्यापूर्वी पखाले हे आठ वर्षे भारिप- बमसंचे मालेगाव तालुका अध्यक्ष होते. ते दररोज कोल्ही तलावात पोहण्यासाठी जात होते. गुरुवारी सकाळी ६ वाजताच्या दरम्यान ते पोहण्यासाठी मित्रांसमवेत तलावावर गेले; मात्र अस्वस्थ वाटत असल्याने त्यांनी पोहण्याऐवजी काठावर बसून आंघोळ करणार असल्याचे मित्रांना सांगितले होते. त्यामुळे बाकीचे पोहण्यासाठी तलावात गेले. परत आले तर त्यांना पखाले तिथे दिसले नाहीत. त्यांनी घटनेची माहिती पखाले यांच्या नातेवाइकांना व पोलिसांना दिली होती. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूसह पिंजर येथून संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने गुरुवारी रात्री ७ वाजेपर्यंंत प्रकल्पात शोध कार्य चालू ठेवले होते; मात्र ते आढळले नव्हते. शुक्रवारी सकाळी ९ वाजतापासून संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने शोध कार्य हाती घेतले. दुपारी २ वाजतादरम्यान पखाले यांचा मृतदेह शोधण्यात पथकाला यश आले. सायंकाळी ५ वाजता त्यांच्या पा िर्थवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, दोन मुली, भाऊ व बराच मोठा आप्त परिवार आहे.
पिंजरच्या पथकाचे सर्च ऑपरेशन..
कोल्ही येथील धरणात अशोक पखाले बेपत्ता झाल्याची माहिती मिळाल्यावरून पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे हे आपल्या चमूसह घटनास्थळी दाखल झाले. पथक प्रमुख दीपक सदाफळे, सागर आटेकर, आकाश राऊत, अंकुश सदाफळे, अतुल उमाळे, ऋषिकेश तायडे, राजेश इंगळे, गोपाल उमाळे, ऋतिक सदाफळे, गोपाल राऊत, सचिन बंड, महेश साबळे यांनी लगेच सर्च ऑ परेशन सुरू केले. शुक्रवारी दीपक सदाफळे यांनी ‘डीप डायव्हिंग’ व ‘स्विमिंग’ पद्धत वापरून २७ फूट खोल पाण्यातून अशोक पखाले यांचा मृतदेह बाहेर काढला. घटनास्थळी तहसीलदार राजेश वझिरे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बाळासाहेब बोराडे, पोलीस अधिकारी उपस्थित होते.