विधानसभा उमेदवारीसाठी इच्छुकांच्या मुंबई वाऱ्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 03:22 PM2019-07-19T15:22:18+5:302019-07-19T15:23:19+5:30
वाशिम : आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरूवात झाली आहे. यावेळी उमेदवारी आपल्यालाच मिळावी, यासाठी सर्व शक्तीनिशी तयारीला लागलेल्या सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमधील इच्छुक उमेदवारांच्या मुंबई वारीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
- नंदकिशोर नारे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरूवात झाली आहे. यावेळी उमेदवारी आपल्यालाच मिळावी, यासाठी सर्व शक्तीनिशी तयारीला लागलेल्या सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमधील इच्छुक उमेदवारांच्या मुंबई वारीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
वाशिम जिल्हयातील तीनही विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या अनुषंगाने मोठया प्रमाणात हालचाली वाढल्याचे दिसून येत आहे. वाशिम विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलण्यात यावा, या मागणीसाठी अनेकांनी पक्षश्रेष्ठींकडे साकडे घातले आहे. पक्षातीलच काही इच्छूक उमेदवार निवडणुक लढण्याकरिता गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. पक्षात सक्रीय राहून आतापर्यंत केलेल्या कामाच्या फाईल्स घेवून अनेकांनी आपल्याला संधी देण्याची मागणी लावून धरली आहे.
वाशिम विधानसभा मतदारसंघ भाजपाकडे असला तरी मित्र पक्ष शिवसेनेच्यावतिनेही इच्छुकांची गर्दी वाढलेली दिसून येत आहे. अद्यापपर्यंत युतीच्या जागा वाटपाचा निर्णय न झाल्याने शिवसेनेतूनही इच्छुकांनी मातोश्रीवरचा संपर्क वाढविल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस तसेच वंचित बहुजन आघाडीकडूनही इच्छूक उमेदवारांनी मोर्चेबांधणीस सुरूवात केली आहे.
कारंजा विधानसभा मतदारसंघामध्ये येत्या निवडणुकीच्या अनुषंगाने वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. भाजपाच्यावतिने विद्यमान आमदारांनाच पुन्हा एकवेळ उमेदवारी देण्यात येणार असल्याच्या चर्चेने इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी फेरले आहे. कारंजा वि धानसभा मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेच्या वाटयावर आला होता. गत निवडणुकीत युती न झाल्याने दोन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढविली होती. यामध्ये भाजपाच्या उमेदवाराचा विजय झाला होता. त्यामुळे भाजपाच्यावतिने या मतदारसंघावर दावा करण्यात येत असला तरी शिवसेनेतर्फे मात्र हा मतदार संघ आमच्या वाटयावर असल्याने शिवसेनेचा उमेदवार देण्याची मागणी रेटली जात आहे.
दूसरीकडे वंचित बहुजन आघाडीच्या इच्छूक उमेदवारांनी निवडणुकीच्या अनुषंगाने रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. या मतदारसंघामध्ये काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेसमधील उमेदवारांच्या हालचाली मात्र पाहिजे त्या प्रमाणात गतिमान झाल्याचे दिसून येत नाहीत.
रिसोड विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचा उमेदवार फायनल असल्याचे बोलल्या जाते. काँग्रेसच्या बालेकिल्याला खिंडार पाडण्यासाठी भाजपा, शिवसेना, शिवसंग्रामच्यावतिने आपापल्यापरिने प्रयत्न करताना दिसून येत आहेत. या मतदारसंघामध्ये उमेदवारीवर शिवसेना व शिवसंग्रामही दावा करित आहे. वंचित आघाडीच्या हालचाली देखील या मतदारसंघामध्ये चांगल्याच गतिमान झाल्या आहेत. दरम्यान, प्रमुख राजकीय पक्षांची उमेदवारी आपल्यालाच मिळावी, यासाठी पक्षश्रेष्ठींची मनधरणी करण्यासाठी बहुतांश राजकीय पक्षाचे नेते मुंबई येथे तळ ठोकून असल्याचे दिसून येत आहे. हा विषय तीनही विधानसभा मतदारसंघामध्ये चर्चेचा ठरला आहे.