युवकावर प्राणघातक हल्ला; तीन आरोपींना दोन दिवसांची कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 02:08 AM2018-04-09T02:08:53+5:302018-04-09T02:08:53+5:30
वाशिम : रस्त्यावरील वाहने बाजूला घ्या, असे का म्हटले म्हणून चौघांनी संगनमत करून वसीम पठाण (रा. भवानी नगर, वय ३५) या युवकास लोखंडी पाइप व तीक्ष्ण हत्याराने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना शिवाजी पोलीस चौकीशेजारी असलेल्या भवानी नगरमधील देशी दारूच्या दुकानानजिक ७ एप्रिल रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, या प्रकरणी दाखल तक्रारीवरून पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांना ८ एप्रिल रोजी न्यायालयासमक्ष हजर केले असता, १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क

भवानी नगर परिसरात वास्तव्य असलेले वसीम पठाण रात्री ९ वाजताच्या सुमारास आपल्या चारचाकी वाहनाने घरी परत जात होते. यादरम्यान राठोड यांच्या देशी दारूच्या दुकानासमोरील रस्त्यावर ग्राहकांनी आपली वाहने रस्त्याच्या मध्यभागी उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याने पठाण यांनी वाहने रस्त्याच्या बाजूला घ्या, असे म्हटले. त्यानंतर गणेश ठेंगडे, आकाश इंगळे, प्रल्हाद ठेंगडे (सर्व रा. भवानी नगर) या तिघांनी संगनमत करून वसीम पठाण याच्या डोक्यावर लोखंडी पाईपने मारून गंभीर जखमी केले.
वसीम पठाणला वाशिम येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले; परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांची अकोला येथे रवानगी करण्यात आली. अकोला येथील खासगी रुग्णालयात पठाणवर उपचार सुरू असून, प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.
या घटनेची माहिती मिळताच शिवाजी पोलीस चौकीचे जमादार नितीन काळे, धनंजय अरखराव, सतीश गुडदे, विष्णू बोंडे यांनी घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण आणले. या घटनेची फिर्याद अफसरखाँ हैदरखाँ यांनी वाशिम शहर पोलीस स्टेशनला दिली. त्यावरून नमूद तीनही आरोपींविरुद्ध भादंविचे कलम ३०७, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. रविवारी आरोपींना न्यायालयात हजर केले असता, तिघांनाही १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
शहरात अफवांचा बाजार
भवानी नगर येथे घटना घडल्यानंतर दोन समुदायात दंगल घडल्याची अफवा वाºयासारखी पसरली. एवढेच नव्हे तर दोघांचा खून झाल्याचीही चर्चा शहरात चांगलीच रंगू लागली. परंतु, ही सर्व अफवा असून, काही समाजकंटक शहरामधील शांततेचे वातावरण भंग करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे कुणीही अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे पोलीस प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे.