सहायक प्राध्यापक पद भरती सुरू करावी !
By Admin | Published: July 17, 2017 02:32 AM2017-07-17T02:32:34+5:302017-07-17T02:32:34+5:30
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन: उच्च शिक्षित पात्र उमेदवारांची शासनाकडे मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: शासनाने २५ मे २०१७ रोजीच्या निर्णयानुसार २०१२ ते २०१७ दरम्यानच्या पदनिश्चितीनुसार व त्यापूर्वी रिक्त असलेल्या सहाय्यक प्राध्यापकांच्या भरतीची प्रक्रिया बंद झाली आहे. त्यामुळे या पदासाठी पात्र उमेदवार नोकरीपासून वंचित राहत असल्याने सहाय्यक प्राध्यापकांची पदभरती प्रक्रिया पुन्हा सुरू करावी, अशी मागणी या पदासाठी पात्र असलेल्या उच्चशिक्षित उमेदवारांकडून करण्यात आली आहे. याबाबत त्यांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे गुरुवारी निवेदन सादर करून ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे पोहोचविण्याची मागणीही करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनाचा आशय असा, की राज्य शासनाने २५ मे २०१७ रोजी जारी केलेल्या निर्णयामुळे २०१२ ते २०१७ दरम्यानच्या पदनिश्चितीनुसार व त्यापूर्वी रिक्त असलेल्या सहाय्यक प्राध्यापकांच्या भरतीची प्रक्रिया बंद झाली आहे. दरवर्षी अनेक विद्यार्थी नेट, सेट, पीएचडी आदि शैक्षणिक अर्हता प्राप्त क रीत आहेत; परंतु त्या प्रमाणात युजीसीचे निर्देश असूनही शासनाच्या धोरणामुळे उच्च अर्हताप्राप्त उमेदवारांना नोकरीपासून वंचित राहावे लागत आहे. युजीसी किंवा विद्यापीठाने वेळोवेळी रिक्त पदे भरण्यासंदर्भात सूचित करुनही संबंधित संस्थाचालक त्यांच्या सुचनांचे पालन न करता रिक्त पदे भरण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्याशिवाय महाराष्ट्र शासनही वेळोवेळी प्राध्यापक पदांच्या भरतीसह इतर महत्त्वाच्या पदांच्या भरतीत कपात करून वेळोवेळी पदभरती कमी करीत आहे. याबाबत महाराष्ट्र विधानसभा/ विधान परिषदेमध्ये पदवीधर शिक्षक आमदार, लोकप्रतिनिधींनी प्रश्न उपस्थित करण्याची अपेक्षा होती; परंतु त्यांच्याकडून हे प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे गेल्या ५ ते ७ वर्षांपासून आमच्यावर बेरोजगार राहण्याची पाळी आली आहे. प्राध्यापक पदांसाठी आवश्यक असलेली अर्हता प्राप्त करणारे अनेक विद्यार्थी अल्पभूधारक, भूमीहीन या वर्गातील असून, उच्च शिक्षण घेऊनही त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. ही बाब लक्षात घेऊन सहाय्यक प्राध्यापकाची भरती तात्काळ सुरू करावी, असे न केल्यास या पदांसाठी पात्र असलेल्या अनेक उमेदवारांवर आत्महत्या करण्याची वेळ येईल, यात शंका नाही.