मुहूर्तावरच नव्या उडिदाला सात हजारांवर भाव
By दादाराव गायकवाड | Published: September 12, 2022 03:12 PM2022-09-12T15:12:39+5:302022-09-12T15:12:49+5:30
कारंजा लाड बाजारात दाखल: हमीपेक्षा ५७१ रुपये जादा
वाशिम: यंदाच्या खरीप हंगामातील उडिद काढणीवर आला असून, वाशिम जिल्ह्यातील कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी ११ सप्टेंबर रोजी नवा उडिद दाखल झाला. मुहूर्तावरच या शेतमालास ७१७१ रुपये प्रती क्विंटलचा भाव मिळाला. जुन्या उडिदाच्या तुलनेत हा भाव जवळपास दुप्पट, तर हमीभावापेक्षा ५७१ रुपये अधिक आहे.
यंदाच्या हंगामातील कमी कालावधीची पिके काढणीवर आली आहेत. उडिद, मुंगाची काढणी शेतकऱ्यांनी सुरू केली असून, काही भागांत लवकर पेरणी केलेले सोयाबीनही काढणीवर आले आहे. गत आठवड्यात नवे सोयाबीन वाशिमच्या बाजार समितीत दाखल झाले. तर सोमवारी कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत नवा उडिदही दाखल झाला. मुहूर्ताच्या खरेदीलाच नव्या उडिदाला लिलावात तब्बल ७१७१ रुपये प्रती क्विंटलचा भाव मिळाला. प्रत्यक्षात शासनाने यंदाच्या हंगामात उडिदाला ६६०० रुपये प्रती क्विंटलचा हमीभाव घोषित केला आहे. अर्थात नव्या उडिदाला हमीपेक्षा ५६१ रुपये अधिक भाव मिळाला.
दुसरीकडे जुन्या उडिदाला सोमवारी कारंजा बाजार समितीत कमाल ४०५० रुपये प्रती क्विंटलचे दर मिळाले. अर्थात जुन्या उडिदाच्या तुलनेत नव्या उडिदाला दुप्पट दर मिळाले आहेत. दरम्यान, कारंजा तालुक्यातील जांब येथील हमीद लालुवाले या शेतकऱ्याने हा उडिद विक्रीसाठी आणला होता. मुहूर्ताची खरेदी असल्याने या शेतकऱ्याचा बाजार समितीकडून शेला, नारळ देऊन सत्कार करण्यात आला.