संस्थाचालकावरील हल्ल्याप्रकरणी दहा जणांवर अँट्रॉसिटीचा गुन्हा
By admin | Published: January 22, 2017 02:53 AM2017-01-22T02:53:12+5:302017-01-22T02:53:12+5:30
मंगरुळपीर येथील घटना; दोन महिन्यांनंतर झाले गुन्हे दाखल.
मंगरुळपीर, दि. २१- पिपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेची जागा हडप करणार्यास विरोध केल्याने संस्थाचालकास मारहाण झाली. या प्रकरणी तपास करून तब्बल दोन महिन्यांनंतर दहा जणांवर अँट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.
यापूर्वी फिर्यादी सुरज इंगोले यांचे तक्रारीवरून गणेश मुकिंदा नाकाडे यांच्यावर अँट्रॉसिटी गुन्हा दाखल केला होता; परंतु उर्वरित आरोपींची नावे चौकशीत ठेवून तपास करून त्यांच्यावर अँट्रॉसिटी कायद्यांतर्गत २0 जानेवारी रोजी रात्री गुन्हे दाखल केले आहेत. तक्रारीत नमूद असे, की पिपल्स एज्युकेशन सोसायटीची जागा मंगरुळपीर येथे आहे. गणेश नाकाडे याने ही जागा हडप करण्याच्या उद्देशाने दहा सहकार्यांना सोब त घेऊन २१ नोव्हेंबर रोजी संस्थेच्या जागेवर पत्र्याचे शेड जबरदस्तीने सुरू केले होते. याला संस्थाचालक सुरज इंगोले यांनी विरोध केला असता, इंगोले यांना बेदम मारहाण झाली.
याबाबत तक्रार दिल्याने गणेश नाकाडे यांच्यावर अँट्रॉसिटी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी सविस्तर चौकशी केल्यानंतर आता अन्य दहा आरोपींवर गुन्हे दाखल केले. देवानंद भारती, सुनील नाकाडे, पवन नाकाडे, भावेश नाकाडे, विलास जाधव, रामेश्वर जाधव, नर्मदाबाई आडे, भीमाशंकर गादगे, किसन पवार, संजय पाटील यांच्यावर भादंवि १४७, १५९, ३२३, ५0६ व अँट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला.