‘एटीएम’ फोडण्याचा प्रयत्न फसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:36 AM2021-01-18T04:36:20+5:302021-01-18T04:36:20+5:30
रात्रगस्तीवर असलेले पोलीस कर्मचारी कैलास कोकाटे व होमगार्ड लक्ष्मण नवघरे यांना १७ जानेवारी रोजी रात्री २ वाजताच्या सुमारास सोनार ...
रात्रगस्तीवर असलेले पोलीस कर्मचारी कैलास कोकाटे व होमगार्ड लक्ष्मण नवघरे यांना १७ जानेवारी रोजी रात्री २ वाजताच्या सुमारास सोनार गल्ली परिसरात एका चारचाकी वाहनामध्ये डोक्याला टोपी व तोंडाला मास्क असलेले दोन इसम आढळून आले. संशय आल्याने या वाहनाचा पाठलाग केला असता, अंधाराचा फायदा घेत मेहकरच्या मार्गाने उपरोक्त दोन इसम वाहनाने पसार झाले. सोनार गल्लीत जेथे वाहन आढळून आले, तेथून हाकेच्या अंतरावर महाराष्ट्र बँकेचे एटीएम असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांनी एटीएमकडे धाव घेतली. एटीएमसमोर एक दुचाकी आणि आतमध्ये दोन व्यक्ती आढळून आल्या. एटीएमच्या दिशेने पोलीस येत असल्याचे पाहून चोरट्यांनी घटनास्थळावरून पोबारा केला. चोरट्यांचा पाठलाग केला असता, आठवडाबाजारमार्गे चोरटे नागरतासच्या दिशेने पसार झाले. घटनास्थळाला पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनुने व चमूने भेट दिली असता, सीसीटीव्ही कॅमेरे व लाइट काढलेले तसेच एटीएम फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण यांना देण्यात आली. रात्रीच्या सुमारास नाकाबंदीदेखील करण्यात आली. परंतु, चोरट्यांचा शोध लागला नाही. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून रात्रीच्या सुमारास एटीएम सील करण्यात आले असून रविवारी ठसेतज्ज्ञांना पाचारण केले. या घटनेचा तपास ठाणेदार आधारसिंग सोनुने यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव पोलीस करीत आहेत.