विवाहितेस विष पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:38 AM2021-03-07T04:38:15+5:302021-03-07T04:38:15+5:30
मंगरुळपीर : सासरच्या मंडळीने विवाहितेस विष पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत हिवरा ...
मंगरुळपीर : सासरच्या मंडळीने विवाहितेस विष पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत हिवरा खु. येथे २७ फेब्रुवारी रोजी घडली. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून ५ मार्च रोजी पाच जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हिवरा खु. येथील पीडित विवाहिता सिंधू युवराज जाधव (२६) हिने दिलेल्या फिर्यादीत असे नमूद केले आहे की, सासरची मंडळी माहेरहून २ लाख रुपये आणण्याची मागणी करीत तिचा शारीरिक व मानसिक छळ करीत होती. तिने माहेरहून पैसे न आणल्याने सासरच्या मंडळीने तिला विष पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी आसेगाव पोलिसांनी युवराज अरुण जाधव, सुनंदा अरुण जाधव, अरुण रामसिंग जाधव, यमुना रामसिंग जाधव, रामसिंग उदयसिंग जाधव ( सर्व रा. हिवरा खु. ता. मानोरा) या पाच आरोपींवर कलम ४९८ अ, ३०७, ३४ भादंवि नुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास आसेगावचे ठाणेदार स्वप्निल तायडे आणि उपनिरीक्षक किशोर खंडार यांच्या मार्गदर्शनात आसेगाव पोलीस करीत आहेत.