प्रशासकीय कामकाज गतिमान करण्याचा प्रयत्न - षण्मुगराजन एस.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 05:21 PM2020-11-07T17:21:02+5:302020-11-07T17:21:26+5:30
Washim Collector Shanmugarajan S. News प्रशासकीय कामकाज गतिमान करण्याचा प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : १० दिवसांपूर्वी वाशिमचे जिल्हाधिकारी म्हणून षण्मुगराजन एस. यांनी सूत्रे स्विकारली. कोरोना नियंत्रणाबरोबरच महसूल वाढीसाठी आणि प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासंदर्भात त्यांच्याशी शनिवारी संवाद साधला असता, प्रशासकीय कामकाज गतिमान करण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
कोरोना आणि जिल्ह्याची स्थिती याबाबत काय सांगाल?
जिल्ह्यात सध्या कोरोनाचा आलेख घसरलेला आहे, ही बाब दिलासादायक म्हणावी लागेल. तथापि, कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क किंवा रुमालचा वापर आणि हात वारंवार स्वच्छ धुणे या त्रिसूत्रीचे पालन करणे अत्यावश्यक आहे. उपलब्ध कोरोना बेडसंदर्भात नागरिकांना माहिती व्हावी म्हणून संकेतस्थळावर ही माहिती नियमित अपलोड केली जाते. कोरोना विषाणू संसगार्चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग सज्ज आहे. नागरिकांनीदेखील प्रशासनाला सहकार्य करून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करावे.
फटाक्यांच्या धुरामुळे कोरोना रुग्णांना त्रास होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणती दक्षता घ्यावी?
यंदा कोरोनामुळे सण, उत्सवावर काही निर्बंध आले. नागरिकांनी साधेपणाने सण, उत्सव साजरे करून कोणत्याही शासकीय नियमाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी. दरवर्षी दिवाळी उत्सवात मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी होते. यावर्षी फटाक्यांची आतषबाजी तसेच फटाक्यांच्या धुरामुळे वायू प्रदूषणाचा थेट परिणाम हा कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तींवर होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी याकडे लक्ष देऊन फटाक्यांची आतषबाजी टाळावी. यावर्षी फटाके फोडण्याचे टाळून त्याऐवजी दिव्यांची आरास मोठ्या प्रमाणावर करून उत्सव साजरा करावा.
महसूल वाढीसाठी काय उपाययोजना आहेत?
आता कोरोना आलेख कमी होत आहे. लवकरच आढावा बैठक घेऊन महसूल वाढीसाठी विशेष उपाययोजना केल्या जातील. शासनाकडून मिळालेले महसूल उद्दिष्ट गाठण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे.
प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासंदर्भात काय सांगाल?
नागरिकांची कामे वेळेत होतील, यादृष्टिने प्रशासकीय यंत्रणांनी कामकाज करावे, अशा सूचना सर्वांना दिल्या आहेत. एकमेकांशी समन्वय साधून सर्व यंत्रणांनी प्रशासकीय कामकाज सुलभ व गतिमान करण्याला प्राधान्य द्यावे तसेच कर्तव्यात दिरंगाई करणाºया, विहित मुदतीत काम पूर्ण करण्यास टाळाटाळ करणाºयांची गय केली जाणार नाही.
सर्वसामान्य जनतेची कामे लवकरात लवकर निकाली कशी निघतील तसेच जिल्हा विकासाच्या दृष्टिने काय करता येईल, याला प्राधान्य दिले जाईल. यापूर्वी जे काही चांगले उपक्रम राबविले असतील, ते यापुढेही सुरू ठेवले जातील. नागरिकांनीदेखील जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे.