समृद्धी महामार्गावर खासगी बस लुटण्याचा प्रयत्न; दगडफेकीत एक प्रवासी गंभीर

By संतोष वानखडे | Published: June 18, 2023 01:43 PM2023-06-18T13:43:18+5:302023-06-18T13:43:42+5:30

प्रवाशांमध्ये दहशत : सुरक्षित प्रवासासाठी उपाययोजना आवश्यक

attempt to rob a private bus on samruddhi highway passenger was seriously injured in the stone pelting | समृद्धी महामार्गावर खासगी बस लुटण्याचा प्रयत्न; दगडफेकीत एक प्रवासी गंभीर

समृद्धी महामार्गावर खासगी बस लुटण्याचा प्रयत्न; दगडफेकीत एक प्रवासी गंभीर

googlenewsNext

संतोष वानखडे, वाशिम: हिंदू हृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील कारंजाजवळ १७ जूनच्या रात्री १२:३० वाजताच्या सुमारास नागपूरहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसवर दरोडेखोरांनी दगडफेक करून लुटण्याचा प्रयत्न केला. दरोडेखोरांच्या बस लुटण्याच्या प्रयत्नात बसमधील एक प्रवासी गंभीर जखमी झाला.

कमी तासात नागपूर ते मुंबईचे अंतर गाठण्यासाठी समृद्धी महामार्ग अत्यंत महत्वाचा मानला जातो. समृद्धी महामार्गावरील अपघाताच्या घटना नियंत्रणात आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना सुरू असतानाच, आता दरोडेखोरांकडून लुटण्याचे प्रयत्न होत असल्याने या मार्गावरून वाहतूक करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. १७ जूनच्या रात्री १२:३० वाजताच्या सुमारास वाशिम जिल्ह्यात कारंजाजवळ विदर्भ ट्रॅव्हल्सच्या खासगी बसला लुटण्याचा प्रयत्न झाला.

नागपूरवरून मुंबईला जाणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्सची बस कारंजा जवळील ढाकली-किनखेड या परिसरात आली असता, दरोडेखोरांनी या बसवर दगडफेक केली. त्यात बसच्या काचा फुटून मोठे नुकसान झाले. दगडफेकीमुळे बसमधील प्रवासीसुद्धा जखमी झाले. दगडफेक होत असताना, चालकाने प्रसंगावधान राखत बस न थांबवता पुढे नेली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या दगडफेकीत दयाराम राठोड (रा.चिखली ता. दारवा जि. यवतमाळ) हे गंभीर जखमी झाले असून कारंजा येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना यवतमाळला पाठवण्यात आले. यावेळी रुग्णवाहिका चालक रमेश देशमुख यांनी मदत केली. याप्रकरणी कारंजा ग्रामीण पोलिसांत तक्रार देण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

यापूर्वीही झाली होती दगडफेक !

समृद्धी महामार्गावरील वनोजा इंटरचेंज (ता.मंगरूळपीर) येथून जवळच असलेल्या २१२ वर छत्रपती संभाजीनगर ते नागपूरकडे जाणाऱ्या ८ ते १० वाहनांवर ३१ मार्च २०२३ रोजी रात्री १० वाजताच्या दरम्यान अज्ञात इसमांकडून दगडफेक करण्यात आली होती. या दगडफेकीमध्ये वाहनांचे बरेच नुकसान झाले तसेच जवळपास दोन तास वाहतूकही प्रभावित झाली होती. त्यानंतर अडीच महिन्यातच पुन्हा कारंजाजवळ खासगी बसवर दगडफेक झाल्याने सुरक्षित प्रवासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Web Title: attempt to rob a private bus on samruddhi highway passenger was seriously injured in the stone pelting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.