सर्वांगीण विकासासाठी समन्वयातून प्रयत्न
By Admin | Published: August 17, 2015 01:35 AM2015-08-17T01:35:09+5:302015-08-17T01:35:09+5:30
सर्वांगीण विकासासाठी समन्वयातून प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिका-यांचे प्रतिपादन.
वाशिम : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या समन्वयातून प्रयत्न सुरू आहेत. शासनाच्या विविध योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोचविल्या जातील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करताना दिली. भारतीय स्वातंत्र्याच्या ६८ व्या वर्धापन दिनानिमित्त वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या मुख्य समारंभात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी ध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित करताना बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक विनिता साहू, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. आर. सिी, जिल्हा परिषद अध्यक्ष सोनाली जोगदंड, आमदार राजेंद्र पाटणी होते. पोलीस निरीक्षक देवीदास इंगळे यांच्या पथकाने राष्ट्रध्वजाला सलामी दिली. शासनाच्या विविध योजनांची माहिती द्विवेदी यांनी दिली. जिल्ह्याच्या सर्वांंगीण विकासासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या समन्वयातून प्रयत्न सुरू आहेत. विशेषत: जिल्हा टंचाईमुक्त करण्यावर अधिक भर देण्यात येत आहे. त्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान सुरू केले आहे. जिल्ह्यातील २00 गावांमध्ये हे अभियान राबिवण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून पाणी टंचाईच्या समस्येवर कायम स्वरूपी उपाययोजना करण्यात येत आहे. त्यामुळे शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघण्यास मदत होईल, अशा आशावाद द्विवेदी यांनी व्यक्त केला. नैसर्गिक आपत्तीने बाधित झालेल्या शेतकर्यांचे सन २0१४-१५ या आर्थिक वर्षातील अल्प मुदतीच्या कर्जाचे मध्यम मुदतीच्या कर्जामध्ये रूपांतरण सुरू आहे. जे शेतकरी या कर्जाचा वार्षिक हप्ता बँकेस विहित मुदतीत परत करतील, अशा शेतकर्यांच्या कर्जावरील व्याज सन २0१५-१६ या वर्षात माफ होणार आहे. यापुढील ४ वर्षाचे ६ टक्के दराने होणारे व्याज शासनातर्फे शेतकर्यांच्यावतीने संबंधित बँकांना देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे जिल्हाधिकार्यांनी सांगितले. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या धर्तीवर दारिद्ररेषेवरील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबांना सुध्दा राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या दराप्रमाणे तांदूळ व गहू वाटप केला जाणार असल्याचे द्विवेदी यांनी स्पष्ट केले.