जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य पदाच्या निवडणुकीकडे लक्ष !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:31 AM2021-06-04T04:31:05+5:302021-06-04T04:31:05+5:30
वाशिम : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील ओबीसी आरक्षण रद्द करण्याबाबत दिलेल्या निकालाच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली पुनर्विचार ...
वाशिम : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील ओबीसी आरक्षण रद्द करण्याबाबत दिलेल्या निकालाच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली पुनर्विचार याचिका फेटाळण्यात आल्याने ओबीसींचे यामधील राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेल्या १४ आणि पंचायत समितीच्या २७ सदस्य पदासाठी निवडणूक कार्यक्रम केव्हा जाहीर होणार? याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.
वाशिम जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणूक जानेवारी २०२० मध्ये झाली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण होत असल्याने, यासंदर्भात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विकास गवळी यांच्यासह अन्य काही जणांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या. सर्वोच्च न्यायालयाने ४ मार्चला आरक्षणासंदर्भातील याचिका निकाली काढत, ओबीसी प्रवर्गातील आरक्षण क्षमतेपेक्षा अधिक झाल्याचा मुद्दा समोर करून संबंधित सदस्यांचे सदस्यत्व रद्द करून दोन आठवड्यांत पुन्हा निवडणूक घेण्याचा आदेश दिला. न्यायालयाच्या या निकालानुसार, ओबीसी प्रवर्गातील जिल्हा परिषदेचे १४ व पंचायत समितीच्या २७ सदस्यांची पदे रिक्त झाली. दरम्यान, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. त्यामुळे ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. वाशिम जिल्हा परिषदेचे १४ सदस्य आणि पंचायत समितीचे २७ सदस्यांची पदे रिक्त झाल्याने यासंदर्भात आता निवडणूक अटळ आहे. संभाव्य निवडणूक लक्षात घेता पायउतार झालेल्या सदस्यांसह पराभूत उमेदवार व इतर इच्छुकही निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे दिसून येते. दुसरी लाट ओसरत असल्याने आणि तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविली जात असल्याने यादरम्यान निवडणूक होणार की आणखी लांबणीवर पडणार? याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.
०००
बॉक्स
असे आहेत जिल्हा परिषदेचे १४ गट !
१) काटा, पार्डी टकमोर, उकळी पेन, पांगरी नवघरे, कवठा खुर्द, गोभणी, भर जहागीर, दाभा, कंझरा, आसेगाव, भामदेवी, कुपटा, तळप बु., फुलउमरी.
२) आसेगाव गटातून माजी जि.प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, काटा गटातून माजी सभापती विजय खानझोडे, तळप गटातून माजी सभापती शोभा गावंडे, कवठा गटातून जनविकास आघाडीचे माजी गटनेते स्वप्नील सरनाईक, उकळीपेन गटातून वंचित बहुजन आघाडीचे माजी गटनेते चरण गोटे हे निवडून आले होते.
३) पुनर्विचार याचिका फेटाळण्यात आल्याने आता निवडणूक अटळ असून, पुन्हा एकदा दिग्गजांना निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. यामध्ये कुणाला ‘राजकीय पत’ कायम ठेवण्यात यश येते आणि हितचिंतकांसह मतदारांकडून कुणाचा ‘राजकीय गेम’ होतो, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.
००००
बॉक्स
निसटता पराभव झालेले उमेदवार लागले कामाला
२०२० च्या जिल्हा परिषद निवडणुकीत निसटता पराभव पत्करावा लागलेले उमेदवार संभाव्य निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे दिसून येते. दाभा जिल्हा परिषद गटात प्रतिस्पर्धी उमेदवाराला ३३ मताने पराभवाला सामोरे जावे लागले होते. भर जहागीर गटात प्रतिस्पर्धी उमेदवाराचा ८२ मतांनी पराभव झाला होता. काटा गटात तत्कालीन उमेदवारांचा १०९७ मताने विजय झाला होता. आता निवडणूक अटळ असल्याने गतवेळच्या निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी पराभूत उमेदवार सर्व तयारीनिशी निवडणूक रिंगणात उतरणार असल्याने तत्कालीन विजयी उमेदवारांसमोर कडवे आव्हान उभे ठाकणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
००००००००