हरी व्याख्यानमालेला श्रोत्यांचा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:48 AM2021-02-17T04:48:43+5:302021-02-17T04:48:43+5:30
हरिभाऊ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या व्याख्यानमालेचे यंदा एकविसावे वर्ष होते. व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफण्यासाठी विनोदी लेखक नरेंद्र इंगळे (अकोट) ...
हरिभाऊ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या व्याख्यानमालेचे यंदा एकविसावे वर्ष होते. व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफण्यासाठी विनोदी लेखक नरेंद्र इंगळे (अकोट) आले होते. यावेळी त्यांनी विनोद : एक जीवन ऊर्जा असा विषय घेऊन श्रोत्यांना खळखळून हसविले. दुसऱ्या दिवशी गुरुवारी ११ फेब्रुवारीला सायंकाळी सात वाजता बुलडाणा येथील प्राचार्य डॉ.गोविंद गायकी यांनी हसत-खेळत कविता, हा विषय फुलविला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक डॉ.सदानंद देशमुख यांनीही साहित्याच्या निर्मिती प्रक्रियेविषयी मौलिक माहिती देत, स्वानुभव कथन केले.
या वर्षीचा वाशीम जिल्हा समाज भूषण पुरस्कार बोरगाव ता. मालेगाव येथील शेतकरी कार्यकर्ते वसंता लांडकर यांना प्रदान करण्यात आला.
शिक्षक आमदार म्हणून विधान परिषद सदस्यपदी निवडून आल्याबद्दल ॲड.किरणराव सरनाईक यांचाही सत्कार करण्यात आला. तद्वतच पीएच.डी. प्राप्त संशोधक प्रा.डॉ.पद्माकर इंगळे, प्रफुल्ल पडघान, ॲड.मोहन गवई आणि प्रा.डॉ.राघवेंद्र बिलोलीकर यांनाही सन्मानित करण्यात आले. अस्वस्थ तांडा या कथासंग्रहाला राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल डॉ.विजय जाधव यांनाही गौरविण्यात आले. हरी व्याख्यानमालेत पहिले दोन दिवस व्याख्याने झाल्यानंतर तिसरा दिवस होता, स्व.द.चिं. सोमण स्मृती व्याख्यानमालेचा! विदर्भ साहित्य संघ शाखा वाशीमच्या वतीने आयोजित या व्याख्यानमालेचे हे आठवे वर्ष होते. पैठण येथील व्याख्यात्या डॉ.उर्मिला चाकूरकर यांनी जीवन एक प्रवास असा विषय मांडताना श्रोत्यांना तासभर खिळवून ठेवले. कार्यक्रमासाठी हरिभाऊ प्रतिष्ठानचे पदाधिकारी, विदर्भ साहित्य संघ शाखा वाशीमची कार्यकारिणी आणि सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
......
विविध मान्यवरांचा सत्कार
विदर्भ साहित्य संघाचा नवोदित लेखनासाठीचा पुरस्कार दिवस बोलू देत नाहीत, या कवितासंग्रहाला मिळाल्याबद्दल कवी गजानन फुसे यांचा सत्कार करण्यात आला. याचबरोबर, विविध सन्मानांसाठी बाबाराव मुसळे, प्रा.हरिभाऊ क्षीरसागर आणि प्रा.गजानन वाघ यांनाही गौरविण्यात आले.