वाशिम जिल्ह्यात शौचालय बांधकामाचे ‘आॅडिट’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 02:15 PM2018-09-01T14:15:20+5:302018-09-01T14:16:27+5:30
वाशिम : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) जिल्ह्यात १.९० लाख शौचालय बांधकाम झाले आहे. काही जणांनी संगनमताने दुबार अनुदान लाटल्याच्या तक्रारी जिल्हा परिषद प्रशासनाकडे प्राप्त झाल्याच्या अनुषंगाने ‘आॅडिट’ केले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) जिल्ह्यात १.९० लाख शौचालय बांधकाम झाले आहे. काही जणांनी संगनमताने दुबार अनुदान लाटल्याच्या तक्रारी जिल्हा परिषद प्रशासनाकडे प्राप्त झाल्याच्या अनुषंगाने ‘आॅडिट’ केले जात आहे. दुबार अनुदान लाटणाºयांकडून अनुदान वसूलीची कार्यवाही केली जाणार आहे.
ग्रामीण भाग स्वच्छ व सुंदर बनविण्याबरोबरच हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने गत तीन-चार वर्षांपासून विशेष मोहिम राबविली. ३१ मार्च२०१८ पूर्वी जिल्हा हगणदरीमुक्त करण्याच्या दिशेने वाटचाल ठेवणाºया जिल्हा परिषद प्रशासनाने त्यापूर्वीच १ लाख ९० हजार ८५४ शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट गाठले होते. यामध्ये कारंजा तालुक्यात २८ हजार ७३८, मालेगाव तालुक्यात ३४ हजार ९२७, मंगरूळपीर तालुक्यात २८ हजार ८३७, मानोरा तालुक्यात ३० हजार २२, रिसोड तालुक्यात ३५ हजार ७१, वाशिम तालुक्यातील ३३ हजार २५९ शौचालय बांधकामाचा समावेश आहे. शौचालय बांधकाम पूर्ण झाल्यानंतर संबंधित पात्र लाभार्थीला १२ हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात येते.
दरम्यान, काही लाभार्थींनी शौचालय असूनही, स्थानिक पातळीवर संगनमताने पुन्हा प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ घेतल्याच्या तक्रारी जिल्हा परिषद प्रशासनाकडे प्राप्त होत आहेत. रिसोड तालुक्यातील भर जहॉगीर परिसरासह या सर्कलमध्येही काही जणांनी शौचालय बांधकाम न करताच प्रोत्साहनपर १२ हजार रुपयांचे अनुदान लाटल्याची तक्रार झाली होती. काही जणांनी शौचालयाचे अर्धवट बांधकाम करून १२ हजार रुपयांचे अनुदान लाटल्याचे प्रकरणही समोर आले होते. रिसोड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांनी प्रत्यक्ष दिलेल्या भेटीदरम्यानही हा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मालेगाव तालुक्यातही स्थानिक पातळीवर दोन ठिकाणी संगनमताने शौचालय अनुदान हडपल्याचे प्रकरण समोर आले होते. याप्रकरणी दोघांकडूनही प्रत्येकी १२ हजार रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली आहे.