रास्त भाव दुकानाचे प्राधिकारपत्र रद्द; पुरवठा विभागाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 05:34 PM2020-05-25T17:34:01+5:302020-05-25T17:34:20+5:30
दुकानाच्या प्राधिकारपत्राची अनामत रक्कम शासन जमा करण्याचे तसेच संबंधित रास्त भाव दुकानाचे प्राधिकारपत्र रद्द करण्याचे आदेश दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : गावातील काही नागरिकांनी २४ मार्च २०२० रोजी दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पुरवठा विभागाच्या निरीक्षण अधिकाºयांनी केलेल्या चौकशीत धान्य पुरवठ्यात गैरव्यवहार करण्यासोबतच इतरही विविध स्वरूपातील दोष सिद्ध झाल्याने केकतउमरा येथील कृषी कन्या महिला बचतगटाच्या रास्त भाव दुकानाचे प्राधिकारपत्र रद्द करण्यात आले, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र जाधव यांनी सोमवार, २५ मे रोजी दिली.
केकतउमरा येथील अशोक धाडवे, अमृता पट्टेबहादूर, रवि पट्टेबहादूर, तुळसाबाई जाधव आणि ज्योती खडसे यांनी सामूहिक तक्रार अर्ज दाखल केला होता. दरम्यान, निरीक्षण अधिकाºयांनी ७ मे रोजी दुकानाची तपासणी करून तसा अहवाल वाशिमच्या तहसीलदारांकडे सादर केला. त्यानुसार, कृषी कन्या महिला बचतगटाच्या रास्त भाव दुकानाच्या दर्शनी भागात फलक नसल्याचे आढळून आले. याशिवाय साठा फलक, भाव फलक आढळला नाही, तक्रार पुस्तिका ठेवलेली नाही, वजन काटा प्रमाणित केल्याची पावती नाही, काही लाभार्थ्यांकडून धान्याचे अधिक पैसे घेण्यात आले, काही कार्डधारकांना देय असलेल्या धान्यापैकी कमी धान्य देत असल्याचे आढळले, कार्डधारकांना पावती दिली जात नाही, पारदर्शक बॉटलमध्ये धान्याचे नमुने ठेवले जात नाही. विशेष गंभीर बाब म्हणजे तपासणीदरम्यान दुकानात गहू १४.४८ क्विंटल कमी आढळून आला; तर तांदूळ ६.४३ क्विंटल अधिक आढळून आला. साखरही जास्त आढळून आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले. त्यावरून जिल्हा पुरवठा अधिकारी जाधव यांनी दुकानाच्या प्राधिकारपत्राची अनामत रक्कम शासन जमा करण्याचे तसेच संबंधित रास्त भाव दुकानाचे प्राधिकारपत्र रद्द करण्याचे आदेश दिले.