अर्थसाहाय्यासाठी ऑटोरिक्षामालकांचा प्रतिसाद मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:37 AM2021-07-26T04:37:50+5:302021-07-26T04:37:50+5:30
एप्रिल महिन्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे कडक निर्बंध लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १३ एप्रिल रोजी ...
एप्रिल महिन्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे कडक निर्बंध लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १३ एप्रिल रोजी केली होती. कडक निर्बंधाच्या कालावधीत परवानाधारक ऑटोमालकांना प्रत्येकी १५०० रुपये देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार जिल्ह्यात अर्थसाहाय्य देण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी परवानाधारक ऑटोरिक्षामालकांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
शंभरावर ऑटोरिक्षामालकांचे अर्ज प्राप्त झाले असून, सर्व ऑनलाईन अर्जांना मान्यता देण्यात आली. या ऑटोरिक्षामालकांच्या बँकखात्यावर १५०० रुपयांचे अर्थसाहाय्य जमा करण्यात आले. जिल्ह्यात साडेतीन हजाराच्या आसपास परवानाधारक ऑटोरिक्षा असून, अर्थसाहाय्य योजनेसाठी अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. अधिकाधिक परवानाधारक ऑटोरिक्षामालकांना लाभ मिळावा याकरिता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात विशेष कक्षाची स्थापनादेखील करण्यात आली आहे. ऑनलाईन माहिती भरताना काही अडचणी आल्यास किंवा आधार कार्ड हे मोबाईल क्रमांकाशी संलग्न करण्यासाठी स्वतंत्र काऊंटरची सुरू करण्यात आले आहे.