ट्रॅक्टरचलित अवजारांच्या उपलब्धतेमुळे बचतगटांच्या उत्पन्नवाढीस चालना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:43 AM2021-05-27T04:43:20+5:302021-05-27T04:43:20+5:30
वाशिम : महिला बचतगटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याकरिता महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत प्रयत्न केले जात आहेत. मानव ...
वाशिम : महिला बचतगटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याकरिता महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत प्रयत्न केले जात आहेत. मानव विकास कार्यक्रमांतर्गत लोकसंचलित साधन केंद्रांना ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचलित अवजारे उपलब्ध करून दिल्यामुळे महिला बचतगटांच्या आर्थिक उत्पन्नवाढीस चालना मिळेल, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. २६ मे रोजी मानव विकास कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या ६ लोकसंचलित साधन केंद्रांना ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचलित अवजारांचे ऑनलाइन वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
खासदार भावना गवळी, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे, मानव विकास कार्यक्रमाचे जिल्हा नियोजन अधिकारी सोनखासकर, महिला आर्थिक महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे यांच्यासह लोकसंचलित साधन केंद्र व बचतगटांच्या अध्यक्ष, सदस्य या कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
यावेळी वाशिम, रिसोड, मालेगाव तालुक्यातील ६ लोकसंचलित साधन केंद्रांना प्रत्यकी १ ट्रॅक्टरसह ट्रॉली, रोटाेव्हेटर, पेरणीयंत्र, नांगर, पंजी, थ्रेशर, फवारणीयंत्र व नऊ फाळी आदी साहित्याचे ऑनलाइन वितरण करण्यात आले.
पालकमंत्री देसाई म्हणाले, महिला बचतगटांचे सक्षमीकरण करण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाकडून राबविण्यात येत असलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत. मानव विकास कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील लोकसंचलित साधन केंद्रांना ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचलित अवजारे उपलब्ध करून दिल्यामुळे महिला बचतगटांतील महिलांना अतिशय कमी दरात व कमी वेळात शेतीच्या मशागतीसाठी तसेच इतर कामांसाठी ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचलित अवजारे उपलब्ध होतील. त्यामुळे शेतीतील उत्पादन वाढीसोबतच बचतगटांच्या उत्पन्नवाढीला हातभार लागणार आहे. महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाने यापुढेही असेच नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावेत. जिल्ह्यात महिला बचतगटांच्या महिलांना विविध शासकीय योजनांचा एकत्रित लाभ देऊन त्यांचे शेती, शेतीपूरक व्यवसायातील उत्पन्न वाढवून त्यांना सक्षम बनविण्यासाठी लवकरच जिल्ह्यात विशेष उपक्रम हाती घेणार असल्याचे पालकमंत्री यावेळी म्हणाले. मान्यवरांनी विचार व्यक्त केले.
०००
महिला बचतगटांची साखळी तयार करावी
खासदार गवळी म्हणाल्या, बचतगटांच्या माध्यमातून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनल्यास जिल्ह्याच्या विकासाला त्याचा मोठा हातभार लागेल. त्यामुळे महिला आर्थिक विकास महामंडळाने जिल्ह्यातील महिला बचतगटांसाठी विविध उपक्रम राबवून उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करावेत. याकरिता ग्रामीण भागातील महिला बचतगटांची साखळी तयार करून छोटे-छोटे उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न करावा.