१३७ प्रकल्पांत सरासरी ६३ टक्के जलसाठा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:46 AM2021-08-13T04:46:41+5:302021-08-13T04:46:41+5:30
वाशिम : जिल्ह्यातील १३७ प्रकल्पांत सरासरी ६३ टक्के जलसाठा असून, यापैकी ३५ प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. वाशिम शहराला पाणीपुरवठा ...
वाशिम : जिल्ह्यातील १३७ प्रकल्पांत सरासरी ६३ टक्के जलसाठा असून, यापैकी ३५ प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. वाशिम शहराला पाणीपुरवठा करणा-या एकबुर्जी प्रकल्पात १०० टक्के जलसाठा असल्याने शहरवासीयांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.
यंदा जूनच्या अखेरीस आणि जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने शेतक-यांची चिंता वाढली होती. दुसरीकडे प्रकल्पातदेखील समाधानकारक जलसाठा नव्हता. जुलै महिन्यात जिल्ह्यात कमी- अधिक प्रमाणात संततधार पाऊस झाल्याने प्रकल्पांतील जलसाठ्यातही वाढ झाली. जिल्ह्यात पाटबंधारे विभागांतर्गत तीन मध्यम आणि १३४ लघू प्रकल्प असे एकूण १३७ प्रकल्प आहेत. १३४ लघू प्रकल्पांत सरासरी ६०.०५ टक्के जलसाठा झाला, तर तीन मध्यम प्रकल्पांत सरासरी ७४.४९ टक्के जलसाठा आहे. जिल्ह्यात वाशिम तालुक्यातील ३६ लघूू प्रकल्पांत सर्वात कमी अर्थात सरासरी २९.०३ टक्के, तर मानोरा तालुक्यातील २५ प्रकल्पांत सर्वात जास्त अर्थात सरासरी ८८.५० टक्के जलसाठा झाला आहे.
००००
असा आहे लघू प्रकल्पांतील जलसाठा
तालुकाप्रकल्प टक्केवारी
वाशिम ३६ २९.०३
मालेगाव २३ ७८.७७
रिसोड १९ ५५.२१
मंगरूळपीर १५ ६९.७७
मानोरा २५ ८८.५०
कारंजा १६ ५७.६८
एकूण १३४ ६०.०५
०००
मध्यम प्रकल्पांतील जलसाठा
एकबुर्जी १००
सोनल ७४.१७
अडान ७०.०२
००००००
०००००००००
बॉक्स
वाशिमकर निश्चिंत पण नियोजन आवश्यक !
वाशिम शहराला पाणीपुरवठा करणा-या एकबुर्जी या मध्यम प्रकल्पात सद्य:स्थितीत १०० टक्के जलसाठा झाला आहे. त्यामुळे वाशिमकरांना उन्हाळ्यापर्यंत पाणी पुरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, प्रकल्पात १०० टक्के जलसाठा असला, तरी प्रशासनाचे योग्य नियोजन नसल्याने शहरातील अनेक भागांत चार ते पाच दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
०००००००००००
३५ प्रकल्पांत १०० टक्के जलसाठा
जिल्ह्यातील ३५ प्रकल्पांत १०० टक्के जलसाठा आहे. यामध्ये वाशिम तालुक्यातील ३, मालेगाव तालुक्यातील ७, मंगरूळपीर तालुक्यातील ७, कारंजा १, रिसोड ३ व मानोरा तालुक्यातील १४ प्रकल्पांचा समावेश आहे.