जिल्हाभरात शिवारफेरीव्दारे जलसंधारणाचा जागर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 04:30 PM2018-09-25T16:30:07+5:302018-09-25T16:31:25+5:30
जिल्हाभरात इच्छूक गावांमध्ये शिवारफेरी काढून जलसंधारणाचा युद्धस्तरावर जागर सुरू असल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा प्रशासन, बीजेएसचा उपक्रम : गावकºयांचा उत्स्फूर्त सहभाग
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: राज्य शासनचा मृद व जलसंधारण विभाग आणि भारतीय जैन संघटना यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार वाशिम जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी ‘सुजलाम, सुफलाम वाशिम’ अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत जिल्ह्यात दीड कोटी घनमीटर गाळ उपसा करण्याचे नियोजन असून, त्यानुषंगाने जिल्हाभरात इच्छूक गावांमध्ये शिवारफेरी काढून जलसंधारणाचा युद्धस्तरावर जागर सुरू असल्याचे दिसून येत आहे.
दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत असल्याने वाशिम जिल्ह्यातील अधिकांश गावांना हिवाळ्यापासूनच पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. या समस्येवर मात करण्यासाठी जिल्ह्यात जास्तीत जास्त जलसंधारणाची कामे होण्यासाठी शासन, प्रशासन व भारतीय जैन संघटना यांच्यावतीने ‘सुजलाम, सुफलाम वाशिम’, हे अभिनव अभियान हाती घेण्यात आले आहे. या माध्यमातून जिल्ह्यात जलसंधारणाची कामे पूर्ण करून जिल्हा दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाने हा उपक्रम गांभीर्याने घेवून जिल्ह्यातील जास्तीत जास्त गावांनी सरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व गावकºयांना सहभागी करून घेत शिवारफेरी काढून जलसंधारणाच्या कामांबाबत प्रभावी जनजागृती करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, गेल्या काही दिवसांपासून गावागावात शिवारफेºयांचे आयोजन केले जात असल्याचे दिसून येत आहे. संबंधित ग्रामपंचायतींच्या ठरावानंतर तलावांमधील गाळ हटविण्याचे काम सुरू केले जाणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकाररी शैलेश हिंगे यांनी दिली.