शाळा, महाविद्यालयांमध्ये लोकशाहीचा जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 05:36 PM2019-09-25T17:36:19+5:302019-09-25T17:36:51+5:30
२५ सप्टेंबरपासून शालेय परिपाठामध्ये विद्यार्थ्यांना मतदान व लोकशाही विषयी माहिती दिली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : विधानसभा निवडणुकीत जास्ती जास्त मतदारांनी सहभागी व्हावे, याकरिता शाळा, महाविद्यालयांमध्ये विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. २५ सप्टेंबरपासून शालेय परिपाठामध्ये विद्यार्थ्यांना मतदान व लोकशाही विषयी माहिती दिली जात आहे.
३० सप्टेंबर रोजी सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये वयोगटानुसार चित्रकला, रांगोळी स्पर्धा व मतदार जागृतीविषयक घोषवाक्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानंतर ५ आॅक्टोंबर रोजी सकाळी प्रभातफेरीचे आयोजन करून मतदार जागृती केली जाणार आहे. ७ आॅक्टोंबर रोजी सर्व शाळा व महाविद्यालयात निबंध स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. ९ आॅक्टोंबर रोजी सर्व विद्यार्थी आपल्या पालकांना पत्र लिहून मतदानाचे महत्व पटवून देणार आहेत. लोकशाही आणि निवडणूक, मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी ११ आॅक्टोंबर रोजी वक्तृत्व व परिसंवाद स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. मतदान, लोकशाही बळकटीकरण आदी विषयवार ३० सप्टेंबर ते १८ आॅक्टोंबर या कालावधीत आठवडी बाजाराची ठिकाणे, गदीर्ची ठिकाणे, चौक येथे पथनाट्य सादर करून मतदार जागृती केली जाणार आहे. १७ आॅक्टोंबर रोजी शाळांमध्ये अभिरूप मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
मतदार जागृतीसाठी प्रत्येक शाळा, महाविद्यालयाने नाविन्यपूर्ण कार्यक्रम राबवून मतदार जागृतीच्या कार्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीप समितीचे नोडल अधिकारी दीपक कुमार मीना, माध्यमिक शिक्षणाधिकारी तानाजी नरळे यांनी केले.