आसोला खुर्द येथील घरकुल लाभार्थी अनुदानाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:46 AM2021-05-25T04:46:24+5:302021-05-25T04:46:24+5:30
घराचे स्वप्न साकार होणार असल्यामुळे या लाभार्थ्यांनी जमा केलेली पुंजी तसेच खासगी सावकारांकडून कर्ज काढून घरासाठी पैसे खर्च केले. ...
घराचे स्वप्न साकार होणार असल्यामुळे या लाभार्थ्यांनी जमा केलेली पुंजी तसेच खासगी सावकारांकडून कर्ज काढून घरासाठी पैसे खर्च केले. या लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याची रक्कम वेळेवर मिळाली; पण दुसऱ्या हप्त्याची रक्कम मिळत नसल्यामुळे घराचे बांधकाम रखडले आहे. या गरीब गरजूंना स्वतःचे पक्के घर बांधून देण्यासाठी रमाई आवास योजनेमार्फत एक लाख २० हजार रुपये आर्थिक साहाय्य करण्यात येते. पहिला हप्ता १५ हजार रुपये मिळाल्याने लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम पूर्ण केले. घरकुलासाठी विटा, सिमेंट, मजुरी उदारी रक्कम काढून लाभार्थ्यांनी खर्च केले. घरकामाचे बांधकाम पूर्ण झाल्यावर नियमाप्रमाणे दुसरा हप्ता मिळेल या आशेवर असलेल्या घरकुल लाभार्थ्यांना अजूनही दुसरा हप्ता मिळालेला नाही. आसोला खुर्द या गावाचा ग्राम सचिव हा नियमित गावात येत नसल्याने हे घरकुल लाभार्थी दुसऱ्या हप्त्यापासून वंचित आहेत. पंचायत समिती प्रशासनाकडून या तीन लाभार्थ्यांना दुसरा हप्ता मिळावा आणि गावात येत नसलेल्या ग्राम सचिवावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी घरकुल लाभार्थ्यांकडून होत आहे. याकडे स्वतः गटविकास आधिकारी यांनी लक्ष घालावे, अशी मागणी आसोला खुर्द येथील नागरिकांमधून होत आहे.