शाळांसाठी ग्रामपंचायतींच्या प्रस्तावाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 12:22 PM2021-07-14T12:22:40+5:302021-07-14T12:22:55+5:30
Awaiting Gram Panchayat's proposal for schools : १५ जुलैपर्यंतच ही प्रक्रिया पार पाडायची असताना, केवळ एका ग्रामपंचायतीने ठराव दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: शासनाच्या ७ जुलैच्या परिपत्रकानुसार ८ वी ते १२ वीच्या शाळा सुरू करण्याची तयारी शिक्षण विभागाने केली आहे. यासाठी सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून ग्रामपंचायतींचे ठराव मागण्यात आले आहेत; परंतु १५ जुलैपर्यंतच ही प्रक्रिया पार पाडायची असताना, केवळ एका ग्रामपंचायतीने ठराव दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आठवी ते १२ वीच्या शाळा सुरू होण्याची शक्यताच धुसर झाल्याचे दिसत आहे.
गेल्या दीड वर्षापासून कोरोना संसर्गामुळे ऑफलाईन शिक्षण बंद आहे. आता कोरोना संसर्गावर बऱ्यापेकी नियंत्रण मिळाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागांतील कोरोनामुक्त गावांत शाळा सुरू करण्याची तयारी शिक्षण विभागाने केली आहे. यासाठी शासन निर्देशानुसार सरपंचांच्या अध्यक्षतेखालील तलाठी, शाळा समिती अध्यक्ष, केंद्रप्रमुख, वैद्यकीय अधिकारी, मुख्याध्यापक आणि ग्रामसेवकांचा समावेश असलेल्या ग्रामस्तर समितीची स्थापना करण्याचे निर्देशही जि. प. शिक्षण विभागाने दिले आणि शासनाच्या परिपत्रकानुसार १५ जुलैपर्यंत ग्रामपंचायतींनी ग्रामस्तर समितीच्या माध्यमातून पालकांशी चर्चा करून शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव पंचायत समिती स्तरावर सादर करण्याच्या सूचना दिल्या; परंतु चार दिवस उलटले असताना जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातून कारखेडा येथील एकाच ग्रामपंचायतीचा प्रस्ताव पंचायत समितीस्तरावर सादर झाला आहे. त्यामुळे कोरोनामुक्त गावातील आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू होणार की नाही, अशी शंकाच उपस्थित होत आहे.
निर्जंतुकीकरणासह लसीकरणाला होणार विलंब
ग्रामीण भागांतील कोरोनामुक्त गावांत शाळा सुरू करण्यासाठी ग्रामस्तर समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीचे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतरही संबंधित शाळेचे निर्जंतुकीकरण करण्यासह लसीकरण न झालेल्या शिक्षकांचे आरोग्य विभागाच्या सहकार्याने लसीकरण करून घेण्याची प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. शिवाय शाळा सुरू झाल्यानंतरही गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी सातत्याने उपाय योजना कराव्या लागणार आहेत; परंतु ग्रामपंचायतींची प्रस्ताव प्रक्रियाच पूर्ण झाली नसल्याने पुढील प्रक्रियेला विलंब लागणार आहे.
शासनाच्या निर्देशानुसार कोरोनामुक्त गावांत आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यासाठी सरपंचांच्या अध्यक्षतेखालील ग्रामस्तर समितीचा ठराव आणि ग्रामपंचायतींच्या प्रस्तावाची आवश्यकता आहे. ग्रामपंचायतीअंतर्गत ही प्रक्रिया सुरू असून, पंचायत समितीस्तरावर प्रस्ताव प्राप्त होताच पडताळणी करून शाळा सुरू करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. - रमेश तांगडे,
माध्यमिक शिक्षणाधिकारी, वाशिम