२०६ घरकुल लाभार्थींना अनुदानाच्या दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:27 AM2021-06-26T04:27:45+5:302021-06-26T04:27:45+5:30
पहिल्या टप्प्यातील ६६ लाभार्थींना घरकुल पूर्ण करून दीड वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. तरीही अनुदान मिळाले नाही. त्यामुळे या ...
पहिल्या टप्प्यातील ६६ लाभार्थींना घरकुल पूर्ण करून दीड वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. तरीही अनुदान मिळाले नाही. त्यामुळे या लाभार्थींमधून संताप व्यक्त केला जात आहे. बेघर लोकांना आपल्या हक्काचे घर मिळावे, याकरिता प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली. राज्य सरकारकडून १ लाख रुपये व केंद्र सरकारकडून १.५० लाख रुपये असा एकूण अडीच लाख रुपयांचा निधी दिला जातो. राज्य सरकारने आपला वाटा दिला आहे, त्यात लाभार्थी यांनी बांधकाम केले आहे. आता स्लॅब व इतर कामासाठी निधीची गरज आहे. निधी नसल्याने अनेक लाभार्थींची कामे खोळंबली आहेत. काही लोकांनी पैसे उसने, व्याजाने घेऊन बांधकाम पूर्ण केले. त्यांचे व्याज वाढले आहे, तर अनेकांजवळ पैसे नसल्याने त्यांनी अर्धवट घरावर टीन पत्रे टाकून कशी तरी राहण्याची सोय केली आहे. पावसाळा असल्याने त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. घरकुल मंजूर झाल्याने घर मोडून पक्क्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या अनेकांच्या डोक्यावरचे छप्पर गेले आहे. केंद्र सरकाने लवकर निधी द्यावा, अशी मागणी लाभार्थी यांनी केली आहे.
............
केंद्र सरकारचा निधी आला नाही. लोकांच्या मागणीनुसार अनेकदा त्याकरिता वरिष्ठ कार्यालयात पत्रव्यवहार केला आहे. कोरोनामुळे निधी थांबला असावा, निधी आला की, लगेच वाटप केला जाईल.
- राजेंद्र अंबोरे
अभियंता, आवास योजना न. पं., मानोरा.
पावणे दोन वर्षांपासून मला केंद्र सरकारचा दीड लाख रुपये निधी मिळाला नाही. राज्य सरकारने दिलेल्या पैशातून व व्याजाने पैसे काढून घर बांधले आहे. काही काम अद्याप बाकी आहे. व्याजाने आणलेल्या पैशांचे व्याज वाढत आहे, त्यामुळे चिंता वाढली आहे. घर पूर्ण बांधले नाही. त्यामुळे घरात पावसाचे पाणी येते.
- सोमसिंग राठोड
लाभार्थी, नाईकनगर, मानोरा.