पुरस्कार वितरणाचा निधी जलसंधारणास!
By Admin | Published: April 10, 2017 01:39 AM2017-04-10T01:39:41+5:302017-04-10T01:39:41+5:30
कारंजा लाड- पुरस्काराची रक्कम पाणी फांउडेशन कडून राबविण्यात येणा-या वॉटर कप स्पर्धेनिमित्त होणा-या जलसंधारणाच्या कामास देण्याचा निर्णय धर्मराज एज्युकेशन सोसायटी कारंजाने घेतला आहे.
कारंजा लाड : पुरस्कार वितरण सोहळा व पुरस्काराची रक्कम पाणी फांउडेशन कडून राबविण्यात येणा-या वॉटर कप स्पर्धेनिमित्त होणा-या जलसंधारणाच्या कामास देण्याचा निर्णय धर्मराज एज्युकेशन सोसायटी कारंजाने घेतला आहे.
धर्मराज एज्युकेशन सोसायटी कारंजाद्वारा दरवर्षी स्व.मोहनराव मुरकुटे स्मृतिप्रीत्यर्थ विविध क्षेत्रातील मान्यवरांना रोख व स्मृतिचिन्ह देऊन पुरस्कृत करण्यात येते. त्यासाठी राधा मोहन मुरकुटे, पार्थ मुरकुटे व उत्कर्ष मुरकुटे हे पुढाकार घेतात व कारंजा शहरात भव्य दिव्य आयोजन केले जाते. त्यासाठी मुरकुटे कुटुंब बरीच पदरमोड करतात. हा समारंभ म्हणजे परिवाराचा भावनिक सोहळा समजला जातो. दरवर्षी विदर्भस्तरीय पुरस्काराचे प्रस्ताव आमंत्रित करणे, निवड समिती सभा आयोजीत करणे व ११ एप्रिलला प्रत्यक्ष पुरस्कार वितरण समारंभ असतो. त्यासाठी अतिथी, त्यांचे मानधन व स्नेहभोजन यावर बराच खर्च होतो. पण या खर्चातून सामाजिक बांधीलकी घट्ट होते. पण काळाची गरज लक्षात घेऊन त्यांनी यावर्षी हा सर्व पैसा जलसंधारणाच्या कामांना देण्याचा निर्णय घेऊन इतरांसमोर आदर्श निर्माण केला. सत्यमेव जयते वॉटर कपच्या प्रसार व प्रचारासाठी, जलसाक्षरता निर्माण करण्यासाठी राधाताई मुरकुटे यांनी स्वत: चार दिवसाचे प्रशिक्षण पूर्ण करून गावात जाऊन सभा घेणे, गावक-यांना जलशिवार, जलसंधारण, जलसाक्षरता यावर मार्गदर्शन करण्याचे कार्य हाती घेतले. आता धर्मराज सोसायटीच्या पुरस्कार वितरण सोहळा व पुरस्काराची रक्कमदेखील जलसंधारणाच्या कामांना देण्याचे घोषित केले आहे.