गायवळ, धोत्रा जहागीर येथे शेतीपूरक व्यवसायाबाबत जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:29 AM2021-07-18T04:29:05+5:302021-07-18T04:29:05+5:30
कृषी विज्ञान केंद्राकडून तांत्रिकदृष्ट्या सक्षम करून उत्पादन वाढीस चालना देण्याच्या हेतूने दत्तक ग्राम योजना राबविली जाते. यात दर तीन ...
कृषी विज्ञान केंद्राकडून तांत्रिकदृष्ट्या सक्षम करून उत्पादन वाढीस चालना देण्याच्या हेतूने दत्तक ग्राम योजना राबविली जाते. यात दर तीन वर्षांनी नवीन गावांची निवड करण्यात येत असून, २०२१ पासून पुढील तीन वर्षांसाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून दोन गावांची निवड करण्यात आली आहे. त्यात कारंजा तालुक्यातील गायवळ व धोत्रा जहागीर या दोन गावांचा समावेश आहे. या दोन्ही गावांत १५ जुलै रोजी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. आर. एल. काळे, एस. के. देशमुख, शुभांगी वाटाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली कृषी विज्ञान केंद्राच्या तांत्रिक सहकार्यातून शेतीवरील खर्च कमी करून पूरक व्यवसायाला चालना देण्याकरिता राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाला धोत्रा जहागीर येथील कार्यक्रमात गावचे सरपंच शीला पवार, पोलीसपाटील नीलेश घाये तसेच ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष जीवन जाधव, उमेद प्रकल्पातील तालुका व्यवस्थापक आरती अघम, देवेंद्र गोवर्धन, कृषी सखी किरण उमाळे, संगणक तज्ज्ञ संकेत राठोड उपस्थित होते. गायवळ येथील कार्यक्रमात गावचे सरपंच सतीष अरुण राऊत, उपसरपंच बाळकृष्ण व्यवहारे व उमेद प्रभाग समन्वयक निशा बोरकर तसेच कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक जी. एल. ढोकणे, कृषी सहायक मंगेश सोळंके यांची उपस्थिती लाभली.
-------------
पोकराच्या योजनांची माहिती
कृषी विभागाकडून घेण्यात आलेल्या कार्यक्रमात नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पांतर्गत (पोकरा) ग्रामस्तरावर सुरू असलेल्या कार्यक्रमाची सखोल माहिती गावकऱ्यांना देऊन तांत्रिकदृष्ट्या पुढील वाटचाल करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राचे सहकार्य घेण्याचे आवाहन करण्यात आले. गावातील प्रगतिशील शेतकरी रवींद्र गायकवाड, रमेश मार्गे आदींनी बीबीएफ तंत्र, शेततळे, तुशार सिंचन, गांडूळखत, फळबागलागवड, बांधावर वृक्षलागवड इ.उपक्रमांची गावातील परिस्थितीची मांडणी केली.