वन वणवा प्रतिबंध सप्ताहानिमित्त जनजागृती अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:37 AM2021-02-07T04:37:18+5:302021-02-07T04:37:18+5:30
वन वणव्यामुळे जंगलाची होणारी हानी लक्षात घेऊन वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी व साळुंकाबाई राऊत महाविद्यालयातील आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या सदस्यांनी कारंजा-मंगरूळपीर ...
वन वणव्यामुळे जंगलाची होणारी हानी लक्षात घेऊन वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी व साळुंकाबाई राऊत महाविद्यालयातील आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या सदस्यांनी कारंजा-मंगरूळपीर वनपरिक्षेत्र अधिकारी अमित शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवेंद्र गावंडे, आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाचे समन्वयक प्रा. बापूराव डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली जंगलालगतच्या वनोजा, भूर, तांदळी, येडशी व माळशेलू या गावांमध्ये जाऊन गावकऱ्यांना माहिती देऊन जनजागृती केली.
जंगलास लागलेल्या आगीत अनेक प्रकारच्या वनौषधी, कीटक, पक्षी त्यांची अंडी, तृणभक्षी प्राणी यांचा अधिवास नष्ट होतो. ग्रामस्थ जंगलात जातेवेळी बिडी, सिगारेट ओढून त्याचे थुटके जंगलात फेकतात. यामुळे जंगलास आग लागते. यावेळी सदस्यांनी जंगलास आग न लागण्यासाठी जंगलालगतच्या शेताचे धुरे, काडीकचरा खबरदारी घेऊन जाळावा, जंगलाला आग लागल्याचे दिसताच तत्काळ त्याची माहिती देऊन आग विझविण्यासाठी वन विभागाला आवश्यक असे सहकार्य करावे, असे आवाहन केले. जंगलास आग लावणे हा दंडनीय अपराध असून, विविध कलमान्वये दोषी व्यक्तीवर कारवाई होते, अशी माहितीही यावेळी ग्रामस्थांना देण्यात आली. या जनजागृती अभियानात वनक्षेत्रपाल नवलकर, वनरक्षक जामकर, महिला वनरक्षक अहिरे, दिघोडे तसेच आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाचे सदस्य सचिन राठोड, सतीश गावंडे, नयन राठोड व आदित्य इंगोले आदी उपस्थित होते.