जबरदस्त! बहिणीपाठोपाठ दोन सख्खे भाऊ पोलिस दलात दाखल, गुंडी गावात घालून दिला आदर्श
By सुनील काकडे | Published: April 15, 2023 05:40 PM2023-04-15T17:40:43+5:302023-04-15T17:41:29+5:30
मोलमजूरी करणाऱ्या वडिलांनी बाळगलेली अपेक्षा पूर्ण करायची, जनतेच्या रक्षणासाठी अंगावर खाकी वर्दी घालायचीच, या ध्येयाने झपाटलेल्या अलका गजभार हिने २०१६ मध्ये पोलिस दलात ‘एन्ट्री’ केली.
वाशिम : मोलमजूरी करणाऱ्या वडिलांनी बाळगलेली अपेक्षा पूर्ण करायची, जनतेच्या रक्षणासाठी अंगावर खाकी वर्दी घालायचीच, या ध्येयाने झपाटलेल्या अलका गजभार हिने २०१६ मध्ये पोलिस दलात ‘एन्ट्री’ केली. तिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तिच्या दोन्ही भावंडांनी देखील पोलिस भरतीचा कसून सराव केला. त्यात त्यांना घवघवीत यश मिळाले असून दोघांचीही अकोला जिल्हा पोलिस दलात हवालदार पदावर निवड झाली आहे. तथापि, एकाच कुटूंबातील तीन भावंडांनी पोलिस दलात दाखल होत जिल्ह्यातील गुंडी (ता.मानोरा) गावात मोठा आदर्श घालून दिला आहे.
गुंडी गावातील सुभाष गजभार यांनी मोलमजूरी करून मुलांना शिक्षण दिले. मुलांनीही आई-वडिलांनी बाळगलेली अपेक्षा पूर्ण करण्याचा मनोमन निर्धार केला. त्यानुसार, मैदानी निवड चाचणीची तयारी करण्यासोबतच लेखी परीक्षेचाही तिने कसून सराव केला. २०१६ मध्ये झालेल्या पोलिस भरती प्रक्रियेत यश संपादन करून तिने पोलिस दलात दाखल होण्याचे स्वप्न पूर्ण केले. सध्या ती वाशिम जिल्हा पोलिस दलात कर्तव्य बजावत आहे.
बहिणीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आकाश आणि नितीन या दोन सख्ख्या भावंडांनीही पोलिस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून सामान्य ज्ञान विषयावर विशेष भर देत धावणे, गोळा फेकणे, लांबउडी, उंचउडीचा कसून सराव केला. अकोला येथे काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या पोलिस भरती प्रक्रियेत दोन्ही भाऊ सहभागी झाले. त्यात दोघांनीही चांगल्या गुणांनी मैदान मारण्यासोबतच लेखी परीक्षेतही गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. जाहीर झालेल्या अंतिम निवड यादीत दोघांचीही पोलिस दलात हवालदार पदावर निवड झाली. ही वार्ता गावात कळताच सुभाष गजभार यांच्या कुटूंबिंयासोबतच गावकऱ्यांनीही आनंदोत्सव साजरा केला.
ध्येयापासून विचलित न होता मिळविले यश
सुभाष गजभार यांची मुलगी अलका हिचे २०१६ मध्ये लग्न झाले. त्यापूर्वीपासूनच ती पोलिस भरतीचा सराव करत होती. लग्नानंतरही त्यात खंड पडू न देता तिने पोलिस दलात दाखल होण्याचे स्वप्न पूर्ण केले. तिचा भाऊ आकाश याचेही २०२० मध्ये लग्न झाले; मात्र ठरविलेल्या ध्येयापासून विचलित न होता त्यानेही रंगविलेले स्वप्न कठोर परिश्रमातून पूर्ण केले, हे विशेष.