आयुर्वेदिक दवाखान्याच्या इमारतीची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 02:49 PM2019-07-30T14:49:08+5:302019-07-30T14:49:13+5:30
काजळेश्वर उपाध्ये (वाशिम) : कारंजा तालुक्यातील काजळेश्वर येथील आयुर्वेदिक दवाखान्याची इमारत शिकस्त झाली असून, येथील वैद्यकीय अधिकाºयाचे पदही रिक्त आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
काजळेश्वर उपाध्ये (वाशिम) : कारंजा तालुक्यातील काजळेश्वर येथील आयुर्वेदिक दवाखान्याची इमारत शिकस्त झाली असून, येथील वैद्यकीय अधिकाºयाचे पदही रिक्त आहे. त्यामुळे दोन आरोग्य सेविका आणि एका आरोग्य सेवकाच्या भरवशावरच येथील कामकाज चालत आहे.
काजळेश्वर येथे पोहा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत आयुर्वेदिक दवाखान्याची स्थापना अनेक वर्षांपूर्वी करण्यात आली. यासाठी दवाखान्याची मुख्य इमारत, प्रसूतीगृह, तसेच वैद्यकीय अधिकाºयांचे निवासस्थान आणि परिचारिकेच्या निवासस्थानाची इमारतही उभारण्यात आली. अनेक वर्षे येथील कारभारही सुरळीत सुरू होता. तथापि, गेल्या काही वर्षांपासून या सर्व इमारती शिकस्त झाल्या आहेत. त्यातच परिसरा झाडेझुडपे वाढली असून, गेल्या काही दिवसापासून दवाखान्यातील डॉक्टरचे पद रिक्त आहे, तर दवाखान्यात औषधीसाठा नाही. या ठिकाणी सद्यस्थितीत दोन आरोग्य सेविका, एक आरोग्य सेवक आणि परिचर एवढेच कर्मचारी असून, त्यांच्याच भरवशावर या दवाखान्याचे कामकाज चालू आहे. काजळेश्वर गावची लोकसंख्या लक्षात घेता दवाखान्यातील सर्व इमारतींची दुरुस्ती करून दवाखान्याला पूर्णवेळ डॉक्टर द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील उपाध्ये यांच्यासह परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
काजळेश्वर येथील आयुर्वेदिक दवाखान्यात डॉक्टरची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या आठ दिवसांत ते या ठिकाणी रुजू होतील. त्याशिवाय येथील शिकस्त इमारतीच्या दुरुस्तीचा प्रस्ताव वरिष्ठस्तरावर पाठविण्यात आला आहे.
- एस. आर. नांदे
तालुका आरोग्य अधिकारी कारंजा लाड