पाटील महाविद्यालयात ‘आझादी का अमृत महोत्सव’ उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:37 AM2021-03-22T04:37:10+5:302021-03-22T04:37:10+5:30
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जे. बी. देव्हडे तर प्रमुख अतिथी तथा वक्ते म्हणून डॉ. योगेश पोहकार रासेयो जिल्हा समन्वयक ...
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जे. बी. देव्हडे तर प्रमुख अतिथी तथा वक्ते म्हणून डॉ. योगेश पोहकार रासेयो जिल्हा समन्वयक वाशिम तसेच डॉ. भाऊराव तनपुरे, रासेयो कार्यक्रम अधिकारी मातोश्री गोटे महाविद्यालय वाशिम यांची उपस्थिती होती. केंद्र व राज्य शासनाच्या प्राप्त मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाचे औचित्य साधून 'आझादी का अमृत महोत्सव' हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत महाविद्यालयाने सेमिनारचे आयोजन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी क्षेत्रीय समन्वयक डॉ. प्रवीण हाडे यांनी या उपक्रमांर्तगत पुढील ७५ आठवडे या अनुषंगाने महाविद्यालयीन स्तरावर विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे प्रास्ताविकातून सांगितले. 'स्वातंत्र्योत्तर काळातील राष्ट्रीय सेवा योजनेचे योगदान' या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. योगेश पोहकर यांनी राष्ट्रीय सेवा योजना हे एक कुटुंब असून रासेयोने केलेल्या नेत्रदीपक कार्याचा आलेख सविस्तरपणे मांडला. तसेच रासेयोच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत कशाचीही पर्वा न करता तत्परतेने संघटन स्वरूपात सेवा जागृतीचे कार्य करत असल्याचे विचार व्यक्त केले. त्याचबरोबर ध्यान, शक्ती आणि पावित्र्य या त्रयीतूनच विकास साध्य होत असतो, असे सांगितले. डॉ. भाऊराव तनपुरे यांनी ‘भारतीय स्वातंत्र्य लढा’ या विषयावर मार्गदर्शन करताना भारतीय स्वातंत्र्य फार मोठी किंमत मोजून प्राप्त झाले असल्याचे सांगत शेकडो वर्षांचा लढा, अनेक हुतात्म्यांचे बलिदान व कित्येक सौभाग्यवतींच्या हजारो बांगड्या फुटल्यानंतर आपण स्वातंत्र्य अनुभवत असल्याचे सांगितले. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील विविध टप्पे त्याचबरोबर वेगवेगळ्या फळीतील समाजसुधारक क्रांतिकारकांचे बहुमोल कार्य याविषयी माहिती सांगीतली. प्राचार्य डॉ. जे. बी. देव्हडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी नि:स्वार्थपणे कार्य करणारी रासेयो ही एक महत्त्वाची संस्था असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. के. व्ही. कोकाटे यांनी तर आभार प्रदर्शन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. टी. सी. भोयर यांनी केले. सेमिनार यशस्वी करण्यासाठी डॉ. ए. डी. बदर, प्रा. जी. डी. कानडे, डॉ. ए. पी. भगत आदीनी पुढाकार घेतला. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.