बाबा कोरोनाने गेले ! मेरे पास सिर्फ मॉं है !!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:31 AM2021-06-04T04:31:13+5:302021-06-04T04:31:13+5:30
वाशिम : कोरोनामुळे आई-वडील दोघांचाही मृत्यू झाला असल्यास त्यांच्या पाल्याला मदत करण्याची घोषणा सरकारने केली आहे. पण, ज्यांचे फक्त ...
वाशिम : कोरोनामुळे आई-वडील दोघांचाही मृत्यू झाला असल्यास त्यांच्या पाल्याला मदत करण्याची घोषणा सरकारने केली आहे. पण, ज्यांचे फक्त वडील कोरोनामुळे गेले आणि तेच घराचा एकमेव आधार होते, अशा पाल्यांनी काय करायचे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कुटुंब चालविणारा घरातील कर्तापुरुष कोरोनाने हिरावून घेतल्याने, आम्हालाही सरकारने मदत करावी, अशी मागणी कुटुंबीयामधून समोर येत आहे.
कोरोना संसगार्मुळे दोन्ही पालक गमाविलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊन त्यांचे यथायोग्य संगोपन होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची जबाबदारी शासनाने जिल्हास्तरीय कृती दलावर सोपविण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या कृती दलात पोलीस अधीक्षक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव, जिल्हा बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांचा समावेश असून, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी या कृती दलाचे सदस्य सचिव आहेत. कोरोनामुळे आई-वडील दोघांचाही मृत्यू झाला असल्यास त्यांच्या पाल्याला मदत करण्याची घोषणा सरकारने केली. मग कोरोनामुळे आई किंवा वडील यापैकी एकाचा मृत्यू झाला असल्यास त्यांच्या पाल्यालादेखील सरकारने मदत करावी, असा सूर उमटत आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे तीन मुलांच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला, तर १८२ बालकांच्या आई किंवा वडिलांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे.
०००००००
१) कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा?
रिसोड तालुक्यातील एका गावातील एक कुटुंब. कुटुंबात पाच सदस्य. घरातील कर्तापुरुष कोरोनाने हिरावून नेला. वृद्ध आई, पत्नी, दोन मुलांच्या संगोपनाची जबाबदारी आता महिलेवर येऊन पडली आहे. दोन मुलांच्या शिक्षणाबरोबरच अन्य जबाबदाऱ्यादेखील पार पाडताना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे. घरातील कर्तापुरुष कोरोनाने हिरावून नेल्यामुळे शासनाने ठोस मदत करायला हवी. कुटुंब चालविणाराच गेल्यामुळे घरची चूल कशी पटवावी? असा प्रश्न या कुटुंबासमोर उभा ठाकला आहे.
...
२) ठोस आर्थिक मदत मिळावी
कोरोनामुळे आई, वडील दोघांचाही मृत्यू झाला असल्यास त्यांच्या पाल्याला मदत करण्याची घोषणा सरकारने केली आहे. कोरोनामुळे घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्याने अशा कुटुंबातील पाल्यांनादेखील सरकारने ठोस मदत करायला हवी, असे मत एका कुटुंबातील सदस्यांनी व्यक्त केले. कोरोनामुळे घरातील कर्तापुरुष गेल्याने याचे दु:ख, शल्य आयुष्यभर राहणार आहे. उदरनिर्वाहासाठी दुसरे कोणतेही साधन नसल्याने सरकारकडून मदत मिळण्याची अपेक्षा आहे. सरकारने अशा कुटुंबालादेखील मदत करावी.
..
३) मोलमजुरी करावी लागणार
कोरोनामुळे घरातील कर्तापुरुष गेल्याने आता मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याची वेळ कुटुंबावर आली आहे. बाबाचे निधन झाल्याने मुलांना चांगल्या शाळेत शिक्षण कसे मिळणार हाही महत्त्वाचा प्रश्न निर्माण होणार आहे. कोरोनामुळे घरातील कर्तापुरुष गेल्याने अशा कुटुंबातील पाल्यांच्या शिक्षणाची व्यवस्था सरकारने करायला हवी. शहरी भागातील चांगल्या, दर्जेदार शाळेत १२वीपर्यंत संपूर्ण मोफत शिक्षण मिळाले तर कुटुंबाला तेवढाच आधार होईल, असे मत व्यक्त होत आहे.
०००००
तीन जणांचे आई-वडिलांचे छत्र हरवले
१) कोरोनामुळे आई-वडील दोघांचाही किंवा दोनपैकी एकाचा मृत्यू झाला असल्यास त्यासंदर्भात सर्वेक्षण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिले महिला व बालकल्याण विभाग, पंचायत विभाग, महिला व बालविकास विभागाला दिले होते.
२) त्यानुसार जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात सर्वेक्षण करण्यात यावे. जिल्ह्यातील तीन बालकांचे आई-वडील दोघांचाही मृत्यू झाला आहे. १८२ बालकांच्या आई किंवा बाबा यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे.
३) कुटुंबातील कर्त्यापुरुषाचा मृत्यू झाला असेल आणि घरची आर्थिक परिस्थिती बिकट असेल तर शासनाच्या बालसंगोपन योजनेंतर्गत ११०० रुपये दरमहा अर्थसाहाय्य केले जाणार आहे. तत्पूर्वी संपूर्ण बाबींची पडताळणी केली जाणार आहे.
००००००
कोरोनाचे एकूण रुग्ण ४०,२७५
बरे झालेले रुग्ण ३७,८३७
उपचार सुरू असलेले १,८५१
एकूण मृत्यू ५८६
०००००००००