‘बेबी केअर कीट’ची योजना कागदोपत्रीच झाली लागू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 03:36 PM2019-01-28T15:36:59+5:302019-01-28T15:37:08+5:30
वाशिम : ‘बेबी केअर कीट’ योजनेची अंमलबजावणी २६ जानेवारीपासून होणार होती. मात्र, नियोजित दिवशी या योजनेसंदर्भात कुठेही प्रचार-प्रसिद्धी झाली नाही किंवा साहित्य देखील मिळाले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : नवजात बालकांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रसुतीनंतर जन्माला येणाऱ्या बालकांना सुरक्षेच्या दृष्टीकोणातून ठराविक साहित्यांचा पुरवठा करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुषंगाने राज्यभरातील शासकीय रुग्णालयांमध्ये जन्मणाºया बालकांना २ हजार रुपये किंमतीचे साहित्य असलेली ‘बेबी केअर कीट’ पुरविण्यात येणार असून त्याची अंमलबजावणी २६ जानेवारीपासून होणार होती. मात्र, नियोजित दिवशी या योजनेसंदर्भात कुठेही प्रचार-प्रसिद्धी झाली नाही किंवा साहित्य देखील मिळाले नाही. विशेष म्हणजे या योजनेबाबत प्रशासकीय यंत्रणाही अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे.
शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय रुग्णालयांमध्ये गरोदरपणीच नाव नोंदणी केलेल्या व त्याचठिकाणी प्रसुत झाल्यानंतर २ महिन्याच्या आत अर्ज सादर करणाºया महिलांना पहिल्या प्रसुतीच्या वेळी मुलगा किंवा मुलगी जन्मल्यानंतर नवजात बालकाचे कपडे, प्लास्टिक लंगोट, झोपण्याची लहान गादी, टॉवेल, तापमापक यंत्र, २५० मीली अंगाला लावायचे तेल, मच्छरदाणी, छोट्या आकाराचे ब्लँकेट, लहान प्लास्टिकची चटई, ६० मीली शाम्पू, खेळणी-खुळखुळा, नख काढण्याकरिता नेलकटर, हातमोजे-पायमोजे, आईसाठी हात धुण्याचे लिक्विड, लोकरीचे कापड, बॉडी वॉश लिक्विड आदी साहित्यांची ‘बेबी केअर कीट’ पुरविली जाणार असल्याचा शासन निर्णय डिसेंबर २०१८ मध्ये पारित झाला. त्याची अंमलबजावणी प्रजासत्ताकदिन अर्थात २६ जानेवारीपासून करण्याचे शासनाचे निर्देश होते. मात्र, २६ जानेवारीला या योजनेचा कुठेही प्रचार-प्रसार झाला नाही. महिला व बालविकास अधिकारी किंवा तालुका आरोग्य अधिकाºयांनाही यासंदर्भात कुठलेही निर्देश नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बालमृत्यू दर कमी करण्यासाठी शासकीय रुग्णालयांमध्ये जन्माला येणाºया बालकांना ‘बेबी केअर कीट’ पुरविण्यात येणार असल्याचा शासन निर्णय प्राप्त झाला. मात्र, २६ जानेवारीला नेमक्या कुठल्या पद्धतीने योजनेच्या अंमलबजावणीस सुरूवात करायची, याबाबत कुठलेही निर्देश प्राप्त झालेले नव्हते. शासनाच्या आदेशानुसार पुढची कार्यवाही केली जाईल.
- नितीन मोहुर्ले
महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा परिषद, वाशिम