कोरोनातून बरे झाल्यानंतर पाठदुखी, कंबरदुखीचा त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 12:13 PM2021-07-11T12:13:24+5:302021-07-11T12:13:43+5:30

Back pain, low back pain after healing from corona : रुग्णांनी घाबरून न जाता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.

Back pain, low back pain after healing from corona | कोरोनातून बरे झाल्यानंतर पाठदुखी, कंबरदुखीचा त्रास

कोरोनातून बरे झाल्यानंतर पाठदुखी, कंबरदुखीचा त्रास

Next

संतोष वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोनातून बरे झालेल्या अनेकांना पाठदुखी, कंबर व मानदुखी तसेच मांडी घालणे, शाैचास बसण्यास त्रास जाणवत असल्याचे समोर येत आहे. अशी लक्षणे आढळून येत असलेल्या रुग्णांनी घाबरून न जाता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.
कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. कोरोनातून बरे झालेल्या अनेकांना विविध प्रकारच्या अन्य आजारांनाही सामोरे जावे लागत आहे. यामध्ये पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी या आजारांचाही समावेश आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर पायऱ्या चढताना व मांडी घालताना त्रास होणे, पाठदुखी, कंबरदुखीचा त्रास जाणवत असल्याचे रुग्ण पुढील उपचारासाठी डॉक्टरांकडे येत असल्याचे दिसून येत आहे. पाठदुखी, कंबरदुखी आणि मणक्यांच्या आजाराला चुकीची जीवनशैली कारणीभूत ठरू पाहत आहे. 
कोरोनातून बरे झाल्यानंतर एकाच ठिकाणी अधिक काळ बसून काम केल्यानेही अनेकांना पाठदुखी, कंबरदुचीचा त्रास जाणवत आहे. शारीरिक व्यायामाचा अभाव, बैठी व्यवस्था यामुळे पाठीच्या मणक्यांवर एकसारखा ताण पडतो. शारीरिक व्यायामाचा अभाव असल्यामुळे मणक्यांना आधार देणाऱ्या मांसपेशी कमजोर होतात. त्या पाहिजे तितका आधार मणक्यांना देऊ शकत नाहीत. त्यामुळे पाठदुखी उद्भवते. सांध्यात खराबी आल्यामुळे अर्थात ‘फॅसेट जॉइंट डिसफंक्शन’मुळेही पाठदुखी सुरू होऊ शकते. विचित्र पद्धतीने वाकल्यावर, ओझे उचलल्यावर किंवा ओढल्यावर मणक्यांमधील स्नायूंच्या पडद्याला इजा होऊन पाठ दुखू शकते. जिल्ह्यात सध्या पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखीच्या आजारांचे रुग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहे. लक्षणे आढळून येताच सल्ला घ्यावा, असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांनी केले.

पाठदुखी/कंबरदुखीची लक्षणे
एकाच जागी दीर्घकाळ बसण्याने, पालथे झाल्याने, वजन उचलल्याने किंवा वाकण्याने वेदना वाढणे
पाठीच्या वेदनांचे पायांकडे सरकणे.
पायांत किंवा मांडीत झिणझिण्या आणि बधिरतेसोबत वेदना होणे,
वेदनेसोबत मूत्राशय आणि आतड्यांच्या हालचालींवरील नियंत्रण सुटणे
वेदनेसोबत खूप ताठरपणा येणे, ज्यामुळे बसताना, उभे असताना किंवा फिरताना अस्वस्थता येणे.


पाठदुखी, कंबरदुखीचा त्रास असलेल्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. यामध्ये कोरोनातून बरे झालेल्या काही रुग्णांचाही समावेश आहे. कंबर दुखणे, शाैचास बसण्यास त्रास होणे, मांडी घालणे त्रासदायक ठरणे, पायऱ्या चढताना त्रास होणे अशी लक्षणेही आढळून येत आहे. अशी लक्षणे जाणवत असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- डॉ. विवेक साबू, अस्थिरोगतज्ज्ञ, वाशिम

कोरोनातून बरे झालेल्या काही जणांना पायामध्ये, हातामध्ये, रक्तवाहिण्यांमध्ये गुठळ्या तयार होणे, अशी लक्षणे आढळून येतात. आजार गंभीर होऊ नये म्हणून काही त्रास जाणवताच. अशा रुग्णांनी घाबरून न जाता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घ्यावा. अंगावर दुखणे काढू नये.
- डॉ. सुनील राठोड
अस्थिरोगतज्ज्ञ, वाशिम

Web Title: Back pain, low back pain after healing from corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.