नादुरुस्त रस्ते, धोकादायक पुलांचा प्रश्न ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:28 AM2021-06-18T04:28:42+5:302021-06-18T04:28:42+5:30
जिल्ह्यात १० जून रोजी सर्वदूर धुवाधार पाऊस कोसळला. यंदाच्या पावसाळ्यातील या पहिल्याच मोठ्या स्वरूपातील पावसामुळे प्रशासकीय यंत्रणेचा मान्सूनपूर्व नियोजनातील ...
जिल्ह्यात १० जून रोजी सर्वदूर धुवाधार पाऊस कोसळला. यंदाच्या पावसाळ्यातील या पहिल्याच मोठ्या स्वरूपातील पावसामुळे प्रशासकीय यंत्रणेचा मान्सूनपूर्व नियोजनातील गाफीलपणा चव्हाट्यावर आला. त्यानंतरही गेल्या ७ दिवसांत अधुनमधून दमदार पावसाची हजेरी सुरूच असून मानोरा शहरातील दिग्रस मार्गावर, येडशी (ता. मंगरूळपीर) फाट्यानजीक, नागठाणा (ता. वाशिम), दापुरी खु. (ता. रिसोड), जवळा (ता. मानोरा) आदी ठिकाणी निर्माणाधिन पुलांची रखडलेली कामे व अस्तित्वात असलेल्या छोट्या स्वरूपातील जमीन समांतर पुलांमुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊन शेकडो हेक्टर शेतजमीन अक्षरश: खरडून गेली आहे. यासह अनेक ठिकाणी वाहतूक जागीच ठप्प झाल्याचा प्रकारदेखील घडला.
धोकादायक अवस्थेतील या पुलांप्रमाणेच विविध ठिकाणच्या रस्त्यांचीही प्रचंड दुरवस्था बनली आहे. त्यात प्रामुख्याने रिसोड शहरातील सिव्हिल लाईनकडे जाणारा मुख्य रस्ता, मंगरूळपीर-मानोली, वनोजा-पिंजर, आमगव्हाण-कोंडोली, मोप-बोरखेडी, मानोरा-कारपा यांसह इतरही शेकडो रस्त्यांचा समावेश आहे. तथापि, नदी-नाल्यांवरील धोकादायक पुलांमुळे उद्भवणारी पूरपरिस्थिती व रस्त्यांअभावी दळणवळणाचा जाणवणारा प्रश्न लक्षात घेता, प्रशासनाने पावसाळा सुरू होण्यापूर्वी चोख नियोजन करायला हवे होते; मात्र याबाबत उदासीनता बाळगण्यात आल्याने पावसाळ्याच्या पहिल्याच महिन्यात जनजीवन पुरते विस्कळित बनल्याचे दिसून येत आहे.
........................
बाॅक्स :
पूरपरिस्थिती उद्भवल्यास नदीकाठची ६१ गावे होतात बाधित
जिल्ह्यातून पैनगंगा, पूस, कांच, अरुणावती, अडाण, बेंबळा, निर्गुणा, काटेपूर्णा आदी नद्या वाहतात. परिणामी, अतिवृष्टी होऊन पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास नदीकाठची ६१ गावे बाधित होतात. त्यात गोहोगाव, महागाव, धोडप बु., भापूर, तांदुळवाडी, सरपखेड, मोठेगाव, देगाव, लिंगा कोतवाल, किनखेड, मसलापेन, हिवरापेन, पेडगाव, देऊळगाव बंडा, बेलखेडा, आसेगाव पेन, वरूड तोफा, रिठद, खडकी, बोरखेडी, पाचंबा, गणेशपूर, बाळखेड, वटफळ, पेनबोरी, चिचांबापेन, अडोळी, मांगूळझनक, नेतन्सा, आंचळ, गोवर्धन, जवळा बु., हिवरा बु., कोंडोली, धामणी, कारखेडा, वरोली, मानोरा, रामतीर्थ, मंगरूळपीर, आमगव्हाण, गिरोली, शेमलाई, आंबोडा, लाडेगाव, पिंपळगाव बु., उकर्डा, दिघी, वाकी, वाघोळा, खेर्डा, काजळेश्वर, भाैरद, भिलदुर्ग, वाघी बु., दुबळवेल, वाडी रामराव, पिंपरी बु., मोझरी, धोत्रा, पिंपळखुटा या गावांचा समावेश आहे.
...................
३७ लाखांच्या भरपाईचा प्रस्ताव
मानोरा तालुक्यातील कोंडोली येथून वाहणाऱ्या अरुणावती नदीवर सन २००० मध्ये बांधलेला पूल १० जून रोजी पहिल्याच पावसात वाहून गेला. पुराचे पाणी शेतात शिरून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून ३७ लाखांच्या नुकसान भरपाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.