विरोधकांच्या हस्तकांनी बालाजी कारखाना बंद पाडला - राजू शेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 05:39 PM2019-09-18T17:39:30+5:302019-09-18T17:39:39+5:30
श्री बालाजी सहकारी साखर कारखाना हा राजकीय विरोधकांच्या हस्तकांनी बंद पाडला असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार राजु शेट्टी यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
किनखेडा (वाशिम) - रोजगार निर्मिती, शेतकºयांना शाश्वत उत्पादन देण्याची ताकद साखर व्यवसायात आहे. केशवनगर येथील श्री बालाजी सहकारी साखर कारखाना हा राजकीय विरोधकांच्या हस्तकांनी बंद पाडला असून, हा कारखाना सुरू होण्यासाठी सर्वांगीन प्रयत्न आवश्यक आहेत, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार राजु शेट्टी यांनी केशवनगर येथे १८ सप्टेंबर रोजी केले.
बालाजी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासंदर्भात केशवनगर येथे आयोजित एल्गार सभेत ते बोलत होते. यावेळी शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, संघटनेच्या महिला आघाडी प्रमुख रसिका ढगे, संघटनेचे प्रवक्ते अनिल पवार, सुनील धाबेकर, डॉ.चौधरी, जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोेले आदि उपस्थित होते. शेटटी म्हणाले की, रोजगार निर्मिती, शेतकºयाला शाश्वत उत्पादन देण्याची ताकद साखर व्यवसायात आहे. म्हणुन हा कारखाना चालु होणे आवश्यक आहे. सध्या कारखाना बँकेच्या ताब्यात असुन त्याचा लिलाव काढला आहे. परंतु काही सभासदांनी न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे लिलाव झाला नाही आणि न्यायालयाचा निकालही झाला नाही. त्यामुळे कारखाना १९ वर्षापासुन बंद अवस्थेत आहे. तो चालु करण्यासाठी राजकारणापलिकडे दृष्टीकोन ठेवून न्यायालयीन प्रकरणे सामोपचाराने मिटवावी लागणार आहेत. कारखाना विकणे फायदाचे नाही. यावेळी बालाजी साखर कारखान्याचे संस्थापक तथा माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर यांचा संदेश घेवुन त्यांचे पुत्र सुनिल धाबेकर उपस्थित होते. हा संदेश सरपंच सुमन गालट यांनी वाचुन दाखविला. या संंदेशात म्हटले की, जंगल असलेल्या ठिकाणी कारखान्याची नोंदणी झाल्यापासुन ३९ महिन्यात उभा राहिलेला, १२५० मेट्रीक टन गाळप क्षमता असताना २३०० ते २४०० टन गाळप करणारा, दोन वेळा सुवर्णपदक मिळविणारा, पहिल्या तीन वर्षात कर्ज परतफेड करणारा विदर्भातील पहिला कारखाना म्हणुन बालाजीने नावलौकीक मिळविला होता. परंतु याच भागातील काही विघ्नसंतोषी राजकीय विरोधकांनी कर्मचाºयांत फुट पाडून संप आंदोलने सुरु केली. अनेक कारखान्यांकडे २०० ते ३०० कोटी रुपये कर्ज असतांना केवळ १८ कोटी कर्जासाठी त्रास देण्यात आला. हा कारखाना सुरू होण्यासाठी सर्वांगीन प्रयत्न आवश्यक असल्याचे म्हटले. यावेळी रविकांत तुपकर, रसिका ढगे यांनी विचार व्यक्त केले. संचालन व आभार प्रदर्शन जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांनी केले.