वाशिम जिल्ह्यात तीन ठिकाणी उभारले जाणार बलून बॅरेज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 03:35 PM2018-08-12T15:35:38+5:302018-08-12T15:36:51+5:30
वाशिम : सिंचनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या जिल्ह्यातील बोरव्हा, घोटा शिवणी आणि सत्तरसावंगा येथे बलून बॅरेज उभारले जाणार.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सिंचनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या जिल्ह्यातील बोरव्हा, घोटा शिवणी आणि सत्तरसावंगा येथे बलून बॅरेज उभारले जाणार असून ५ जुलै रोजी नागपूरच्या विधानभवनात झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करित उद्भवलेल्या त्रुटी दुर करून सुधारित प्रस्ताव विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाकडे सादर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बांग्लादेश, आंध्रप्रदेश, मुंबई आदीठिकाणी उभारण्यात आलेल्या बलून बंधाºयांचा परिणामकारक फायदा दिसून आलेला आहे. त्या धर्तीवर सिंचन अनुशेष निर्मुलन कार्यक्रमांतर्गत समाविष्ट बोरव्हा, घोटा शिवणी आणि सत्तरसावंगा येथे बलून बॅरेजेस उभारण्याच्या कामासाठी मुख्यमंत्र्यांनी जलसंपदा विभागाला सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, स्थानिक प्रशासनाने उद्भवलेल्या त्रुटी दुर करून सदर सुधारित प्रस्ताव विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाकडे सादर केला असून तेथून तो नाशिक येथील राज्य तांत्रिक सल्लागार समितीकडे मंजूरीसाठी पाठविला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
काय आहे बलून बॅरेज!
नदी अथवा सिंचन प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’ होवून पुरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्यास संभाव्य नुकसान टाळण्याकरिता बलून बॅरेजेस अत्यंत फायदेशीर ठरतात. सिमेंट-काँक्रीटच्या फाऊंडेशनमध्ये फसवून हवा कमी-अधिक करण्याची सोय यात दिलेली असते. यामुळे पावसाचे पाणी अडविणे आणि संभाव्य धोका टाळणे हे दोन्ही उद्देश सफल होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.