बांबर्डावासी सहा दिवसांपासून अंधारात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 02:18 AM2017-09-11T02:18:52+5:302017-09-11T02:19:00+5:30
बांबर्डा कानकिरड: कामरगाव ३३ के व्ही. अंतर्गत येत असलेल्या ग्राम बांबर्डा कानकिरड येथील गावठाण फिडरवर अदलून-बदलून बसविण्यात आलेले तिन्ही रोहित्र जळाल्याने या ठिकाणी सहा दिवसांपासून अंधारात गावकरी विविध समस्यांचा सामना करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बांबर्डा कानकिरड: कामरगाव ३३ के व्ही. अंतर्गत येत असलेल्या ग्राम बांबर्डा कानकिरड येथील गावठाण फिडरवर अदलून-बदलून बसविण्यात आलेले तिन्ही रोहित्र जळाल्याने या ठिकाणी सहा दिवसांपासून अंधारात गावकरी विविध समस्यांचा सामना करीत आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी बांबर्डा कानकिरड येथील गावठाण फिडरवरील रोहित्रात तांत्रिक बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. त्याबाबतचा अहवाल कामरगाव ३३ के व्ही. उपकेद्रांच्या अभियंत्यांनी कारंजा येथील महावि तरणच्या उपविभागीय कार्यालयाला कळविल्यानंतर संबंधित कार्यालयाकडून येथे ६३ एच पी. क्षमतेचे रोहित्र बसविण्यात आले; परंतु त्यावरून वीजपुरवठा सुरळीत होण्यापूर्वीच ते रोहित्र जळाले. त्यानंतर अशाच प्रकारचे दोन रोहित्र बदलून बसविण्यात आले; परंतु ते रोहित्रही गावातील वीजपुरवठा सुरळीत होण्याआधीच जळाले. त्यामुळे गेल्या सहा दिवसां पासून सदर गावात अंधाराचे साम्राज्य पसरले असून, दिवसा विजेअभावी गावकर्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच वीजपुरवठा बंद असल्याने येथे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याने गावकर्यांना पाण्यासाठी भटकं ती करावी लागत आहे.
प्रत्यक्षात महावितरणच्या अधिकार्यांनी या ठिकाणी वारंवार रोहित्र का जळत आहेत, त्या कारणांचा शोध घेण्यासाठी वीज वाहिनीची पाहणी करणे आवश्यक होते; परंतु गावा तील लाइनमन वगळता एकाही वरिष्ठ अधिकार्याकडून त्याची दखल घेण्यात आली नाही.
त्यामुळे तीन रोहित्र जळून शासनाचे नुकसान झालेच शिवाय गावकर्यांना वीजपुरवठय़ाअभावी गेल्या ६ दिवसांपासून अंधाराचा सामना करावा लागत आहे. ही समस्या कायमची दूर करण्यासाठी गावकर्यांनी वीज वितरणच्या अधिकार्यांना वारंवार वाढीव भाराचे रोहित्र देण्याची मागणी केली; परंतु अधिकार्यांनी त्या मागणीकडे साफ दुर्लक्ष करून ६३ एच पी चे ट्रान्सफार्मर बसवित आपल्या उदासीन धोरणाचे दर्शन घडविले. या ठिकाणच्या समस्यांची दखल घेऊन वरिष्ठ अधिकार्यांनी १00 एचपी क्षमतेचे रोहित्र बसवावे, अशी मागणी गावकर्यांकडून करण्यात येत आहे.
गावात कृत्रिम पाणीटंचाई
गेल्या काही दिवसांत बांबर्डा येथील तीन रोहित्र जळाल्याने सहा दिवसांपासून गावकरी अंधारातच रात्र काढत असताना वीजपुरवठा खंडित असल्याने गावाची पाणीपुरवठा योजना प्रभावित झाली असून, गावकर्यांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मुबलक पाणी असतानाही गावकर्यांना पाणीपुरवठा होत नसल्याने गावकरी शेतामधून पाणी आणून आपल्या गरजा भागवित असल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे.
अधिकार्यांचा प्रतिसाद नाही
बांबर्डा येथील तीन रोहित्र जळाल्याने सहा दिवसांपासून गावकरी अंधारातच रात्र काढत असताना या ठिकाणी रविवारी रोहित्र बसविणार असल्याचे वाशिम येथील वरिष्ठ अधिकार्यांनी सांगितले; परंतु त्यावर कार्यवाहीच झाली नसल्याने या संदर्भात संबंधित अधिकार्यांशी संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात आला; परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने माहितीच प्राप्त होऊ शकली नाही.