कोरोना महामारीनंतर आता वाशिम जिल्ह्यात ‘वाजव रे जोरात’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 03:42 PM2020-11-11T15:42:55+5:302020-11-11T15:45:49+5:30
बॅंड पथकांना लग्न समारंभात बॅंड वाजविण्यास शासन, प्रशासनाकडून परवानगी मिळाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : यंदा कोरोनामुळे मार्च महिन्यापासून बंद असलेल्या बॅंड पथकांना लग्न समारंभात बॅंड वाजविण्यास शासन, प्रशासनाकडून १५ दिवसांपूर्वी परवानगी मिळाली आहे. त्यामुळे बॅंड पथकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.
शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार लग्न समारंभात फिजिकल डिस्टसिंग राखत जास्तीत जास्त ५० व्यक्तींना उपस्थित राहण्यास परवानगी आहे. या समारंभात बँड पथकांनाही बँड वाजविण्याची परवानगी देण्यात येत असून त्यांचा समावेश ही उपस्थित असलेल्या ५० व्यक्तींमध्ये राहणार आहे. सावर्जनिक मिरवणुकीवर बंदी घालण्यात आली असल्याने याप्रसंगी बँड वाजवण्यावर बंदी राहणार आहे. दरम्यान लग्न समांरभास बॅंड वाजविण्यास परवानगी मिळाल्याने काही अंशी दिलासा मिळाला असून, आता लग्नाच्या मुहुर्तावर पुन्हा ‘ढोल’ वाजणार आहेत. जिल्ह्यात जवळपास १२० पेक्षा अधिक बॅंड पथक आहेत.
मार्च महिन्यापासून बॅंड वाजविण्यावर बंदी होती. सात महिन्यात हा व्यवसाय बंद असल्याने कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली होती. आता परवानगी मिळाली आहे. परंतू, केवळ लग्नसमारंभात बॅंड वाजविता येणार आहे. सर्वच समारंभात बॅंड वाजविण्यास परवानगी असावी.
- संजय कांबळे, बॅण्डपथक चालक