वाशिम नगर परिषद वाजविणार थकबाकीदारांच्या घरासमोर ‘बॅन्ड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 02:18 PM2018-03-06T14:18:45+5:302018-03-06T14:18:45+5:30
वाशिम : नगर परिषदेच्यावतीने शहरातील नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता विविध प्रकारची कर आकारणी करण्यात येते, परंतु कोटयवधी रुपयांची थकबाकीदार कराचा भरणा करण्यासाठी चालढकल करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.
- नंदकिशोर नारे
वाशिम : नगर परिषदेच्यावतीने शहरातील नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता विविध प्रकारची कर आकारणी करण्यात येते, परंतु कोटयवधी रुपयांची थकबाकीदार कराचा भरणा करण्यासाठी चालढकल करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. याकरिता नगरपरिषदेच्यावतिने थकीत करधारकांच्या प्रतिष्ठान, घरांसमोर बॅन्ड वाजवून कर वसुली मोहीम हाती घेणार असल्याने नागरिकांनी धास्ती घेतली आहे.
वाशिम नगरपरिषद क्षेत्रांतर्गंत येत असलेल्या शासकीय- निमशासकीय कार्यालय व घरगुती कर थकबाकीचा आकडा कोटयवधीच्या घरात आहे. नगरपरिषद कर विभाग मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली कर निरिक्षक अब्दुल अजिज अव्दुल सत्तार यांच्या पुढाकारात करवसुलीसाठी परिश्रम घेत आहेत. करवसुलीसाठी जाताना करावरील दंड, व्याज माफ होणार असल्याचे नागरिक सांगत असल्याने करभरणा करुन घेतांना या अधिकारी, कर्मचाºयांना मोठी कसरत करावी लागत आहे. कर विभागातील अधिकारी कर्मचारी नागरिकांना समजावून सांगत असल्याने काही जणांनी कराचा भरणा केला तर काही जण प्रतीक्षा करतांना दिसून येत आहेत. यासाठी वाशिम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी कर भरणा न करणाºया नागरिकांच्या घरातील नळ कनेक्शन बंद करण्याच्या मोहीमेस प्रारंभ केला आहे. यानंतरही कराचा भरणा वेळेच्या आत न झाल्यास थकीतधारकांच्या घरासमोर , प्रतिष्ठानसमोर बँड वाजविल्या जाणार आहे. या कारवाईमुळे अनेक नागरिकांनी धास्ती घेतली आहे. ज्यांना या मोहीमेची कल्पना झाली ते थकीतदार करविभागात जावून आपल्या कराची विचारणा करुन भरणा करतांना दिसून येत आहेत.
नगरपरिषदेचा कर भरणा १०० टक्के व्हावा यासाठी मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली करनिरिक्षक अ.अजिज अ. सत्तार, एस.एम. उगले, करसंग्राहक एस.एल. किरळकर, एस. ए. इंगळे, डी.एल. देशपांडे, एस.एस. काष्टे, आर.एच. बेनीवाले, एम.डी. इंगळे, एन.के. मुल्ला, के.डी. कनोजे, एस.एल. खान, अ.वहाब शे. चाँद परिश्रम घेत आहे.
अफवांमुळे करवसुलीवर परिणाम
- शासन स्तरावरुन थकीतदारकांचे दंड , व्याज माफ होणार आहे अशी अफवा पसरल्याने अनेक थकीतदार अशा घोषणेची वाट पाहतांना दिसून येत आहेत. परंतु असे शासनस्तरावरुन कोणीच कळविले नसल्याने याचा थकीतधारकांनाच फटका बसणार आहे. या अफवांचा करवसुलीवर तर परिणाम होतच आहे शिवाय थकीत करधारकांचे सुध्दा नुकसान संभवत आहे. अशा अफवांना बळी न पडण्याचे आवाहन न.प. प्रशासनाने केले आहे.
नळजोडणी खंडित
ज्या थकीत कर धारकांकडे वारंवार पत्रव्यवहार, सूचना देवूनही कराचा भरणा केलेला नाही अशांवर नगरपरिषद प्रशासनाच्यावतिने नळजोडणी खंडित करण्यास सुरुवात केली आहे. नगरपरिषदेचा कराचा भरणा करुन मानहानीपासून बचाव करण्याकरिता थकीतधारकांनी कराचा भरणा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. १०० टक्के करवसुली करण्यासाठी कर विभागातील कर्मचारी झटत आहेत.
मालमत्ताधारकांच्या थकीत रकमेवर प्रतिमाह २ टक्केप्रमाणे शासन राजपत्रानुसार शास्तीची आकारणी करण्यात येत आहे. यापासून सुटका करण्यासाठी नागरिकांनी कर भरणे आवश्यक आहे.
- गणेश शेटे, मुख्याधिकारी, वाशिम नगरपरिषद वाशिम