बंजारा शक्तिपीठ प्रतिनिधींचा पंतप्रधानांशी वार्तालाप!
By admin | Published: March 13, 2017 02:13 AM2017-03-13T02:13:06+5:302017-03-13T02:13:06+5:30
महायज्ञ लक्षचंडी कार्यक्रमाचे दिले निमंत्रण : पोहरादेवीत २४ मार्चपासून महायज्ञ
मानोरा (वाशिम), दि. १२- बंजारा समाजाची काशी म्हणून भारतभर प्रसिद्ध असलेल्या तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे २४ मार्च ते ३ एप्रिलदरम्यान आयोजित लक्षचंडी महायज्ञ कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित राहण्याची ग्वाही दिली, अशी माहिती बंजारा शक्तिपीठाचे सचिव बाबुसिंग महाराज यांनी रविवारी दिली.
केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्यासह अखिल भारतीय बंजारा शक्तिपीठाच्या प्रतिनिधींनी पंतप्रधानांची गत आठवड्यात भेट घेऊन त्यांना लक्षचंडी महायज्ञ कार्यक्रमास उपस्थित राहण्याबाबतचे निमंत्रण दिले. ते स्वीकारून मोदींनी २ एप्रिल रोजी पोहरादेवीत येण्याची ग्वाही दिली, असे बाबुसिंग महाराज यांनी सांगितले. येत्या २४ मार्चपासून पोहरादेवी येथे अखिल भारतीय बंजारा शक्तिपीठाच्या वतीने लक्षचंडी महायज्ञ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शक्तिपीठाचे संस्थापक संत डॉ. रामराव महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार्या या कार्यक्रमात जनतेनेही मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन बाबुसिंग महाराज, गोकुळदास महाराज यांनी केले आहे.