बँक खात्यात त्रूटी; शेतकरी धडकले मानोरा तहसिल कार्यालयात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 04:27 PM2019-08-26T16:27:55+5:302019-08-26T16:28:36+5:30
शेतकऱ्यांनी मानोरा तहसिल कार्यालय येथे धडक देऊन त्रूटी दूर करण्याची एकमुखी मागणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा (वाशिम) : मानोरा तालुक्यात सध्या शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत बँक खात्यात पैसे जमा करणे सुरू आहे. तालुक्यातील दोन हजारापेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या बँक खाते क्रमांकात त्रूटी असून, याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. या पृष्ठभूमीवर सोमवार, २६ आॅगस्ट रोजी शेतकऱ्यांनी मानोरा तहसिल कार्यालय येथे धडक देऊन त्रूटी दूर करण्याची एकमुखी मागणी केली.
पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा केले जाणार आहेत. मानोरा तालुक्यात माहिती संकलीत करताना लाभार्थींचे बँक खाते, आधार क्रमांक यामध्ये त्रूट्या झाल्याचे प्रकार समोर येत आहेत. काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन ते तीन वेळा पैसे जमा झाले तर काही शेतकऱ्यांच्या खात्यात एक रुपयाही जमा झाला नाही. तालुक्यातील जवळपास दोन हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या बँक खाते क्रमांकात त्रूटी असल्याचे प्रकार समोर आले आहेत. आधार कार्ड व मोबाईल क्रमांक एका शेतकऱ्याचा तर बँक खाते दुसऱ्या शेतकऱ्यांने पात्र शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. त्रूटीची दुरूस्ती करून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खाते क्रमांकावर पैसे जमा करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.