‘प्रतिनिधी’ बनविण्यासाठी बँकांची टाळाटाळ!

By admin | Published: June 8, 2017 02:19 AM2017-06-08T02:19:37+5:302017-06-08T02:19:37+5:30

रेशन दुकानदारांना व्यावसायिक प्रतिनिधी बनण्यासाठी करावी लागणार प्रतीक्षा : ४०९ प्रस्ताव धूळ खात

Bank to make 'representatives' to avoid! | ‘प्रतिनिधी’ बनविण्यासाठी बँकांची टाळाटाळ!

‘प्रतिनिधी’ बनविण्यासाठी बँकांची टाळाटाळ!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : रेशन दुकानदारांना बँक प्रतिनिधी बनविण्याचा निर्णय पुरवठा विभागाने घेतला असून, त्या अनुषंगाने जिल्ह्यातील ४०९ दुकानदारांचे प्रस्ताव जिल्हा पुरवठा विभागाला प्राप्त झालेले आहेत. सदर प्रस्ताव संबंधित बँकांकडे पाठवून पाच महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे; मात्र अद्यापही या प्रस्तावावर साधी चर्चाही नसल्याने बँकांची नकारघंटा तर नाही ना? अशी शंका वर्तविली जात आहे.
राष्ट्रीयीकृत बँकेच्या विविध १२ प्रकारच्या सेवा रेशन दुकानदारांमार्फत ग्रामीण भागात पुरविण्यासाठी रास्तभाव दुकानदार व किरकोळ केरोसीन दुकानदारांना बँकेचे व्यावसायिक प्रतिनिधी म्हणून नेमण्याचा निर्णय पुरवठा विभागाने डिसेंबर २०१६ मध्ये घेतला होता. बँक व्यावसायिक प्रतिनिधी बनण्यास इच्छुक असलेल्या दुकानदारांकडून जानेवारी २०१७ पर्यंत संमतीपत्र मागविले होते. त्यानुसार जिल्ह्यातील ७८४ पैकी ३६५ रास्त भाव दुकानदार व ८०९ पैकी ४४ केरोसीन दुकानदार अशा एकूण ४०९ दुकानदारांकडून संमतीपत्र व सविस्तर प्रस्ताव जिल्हा पुरवठा विभागाकडे सादर केला. पुरवठा विभागाने तालुका व बँकनिहाय अहवाल जिल्हाधिकारी व जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांकडे सादर केला. जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांनी संबंधित बँकांकडे पाठपुरावाही केला. मार्च महिन्यात ‘मार्च एन्डिंग’च्या कामांमुळे विलंब होत असल्याचे स्पष्टीकरण बँक व्यवस्थापकांमार्फत पुरवठा विभागाला देण्यात आले; मात्र त्यानंतरही याकडे बँक व्यवस्थापनाने लक्ष दिले नाही. परिणामी, ७ जूनपर्यंतही रेशन दुकानदारांना बँकेचे व्यावसायिक प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्याची कोणतीही कार्यवाही होऊ शकली नाही.

अशी आहेत बँक प्रतिनिधीची जबाबदारी व कार्ये !
व्यावसायिक प्रतिनिधी म्हणून काम करताना रास्त भाव दुकानदारांनी बचतीबाबत जनजागृती करणे, छोट्या ठेवी जमा करणे, कमी रकमेचे कर्ज वाटप करणे, कर्ज मागणीच्या अर्जातील मूळ माहितीची व आकडेवारीची पडताळणी करणे, तसेच कर्ज मागणी अर्ज जमा करणे, स्वयंसहाय्यता बचत गट इत्यादींना चालना देणे आदी १२ प्रकारच्या बँक सेवा पुरवायच्या आहेत; मात्र अद्याप बँकांनी रेशन दुकानदारांची नियुक्तीची कार्यवाही सुरू केली नसल्याने तूर्तास या दुकानदारांना प्रतिनिधी बनण्याची प्रतीक्षा आहे. बँकांकडून प्रचंड दिरंगाई का होत आहे? यामागचे गुढ अद्याप उकलले नाही.

बँकेचे व्यावसायिक प्रतिनिधी बनण्यासाठी इच्छुक असलेल्या रास्त भाव दुकानदार व किरकोळ केरोसीन विक्रेत्यांकडून संमतीपत्र मागविले होते. त्यानुसार ४०९ जणांनी संमतीपत्र सादर केले. या सर्वांचे प्रस्ताव संबंधित बँकांकडे व जिल्हा अग्रणी बँकेकडे सादर करण्यात आले. रेशन दुकानदारांची बँक व्यावसायिक प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यासंदर्भात जिल्हा अग्रणी बँकेकडे पाठपुरावा सुरू आहे.
- अनिल खंडागळे
जिल्हा पुरवठा अधिकारी, वाशिम

Web Title: Bank to make 'representatives' to avoid!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.